शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने नेतेमंडळींनी ‘मातोश्री’वर धाव घेतली असली तरी कोणालाही शिवसेनाप्रमुखांवर उपचार सुरू असलेल्या दुसऱ्या मजल्यावर जाणे शक्य झाले नाही. कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी करून सर्वाना परतावे लागले.
राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी व लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे, गृहमंत्री आर. आर. पाटील, काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांच्यासह विविध नेत्यांनी ‘मातोश्री’वर धाव घेतली होती. कोणत्याही नेत्याला शिवसेनाप्रमुखांवर उपचार सुरू असलेल्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेच वरखाली करीत होते. नेतेमंडळी, उद्योगपती किंवा बॉलिवूडमधील बडय़ा हस्तींना केवळ शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेता आली. शरद पवार यांनी काही काळ उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली.
शिवसेनाप्रमुखांची प्रकृती बिघडल्यानंतर शिवसैनिकांची ‘मातोश्री’ बाहेर झालेली गर्दी तसेच राज्याच्या अन्य भागांत वातावरण काहीसे तणावपूर्ण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री चव्हाण आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढविण्याच्या सूचना पोलीस महासंचालक
आणि पोलीस आयुक्तांना देण्यात आल्याचे गृह खात्याच्या सूत्राकडून सांगण्यात आले. विशेषत: ‘मातोश्री’ बंगल्याच्या परिसरात अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या परिसरात तैनात करण्यात आले आहे.    

Story img Loader