मुंबई : राजकारणातील कटुता कोणताही एक पक्ष दूर करू शकत नाही, तसे सर्वानाच ठरवावे लागेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केले. स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभा या सर्व निवडणुका एकाच कालावधीत घेण्यास पाठिंबा असल्याचे सांगून फडणवीस यांनी प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीचे अतिक्रमण दूर करण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. महाराष्ट्रातील राजकारणात आलेली कटुता दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फडणवीस यांनी नुकतेच सांगितले होते. याबाबत विचारता फडणवीस म्हणाले, नेत्यांनी शांत राहायचे आणि इतरांना बोलायला लावायचे, ही पद्धत बंद करावी लागेल.
अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत न्यायालयाने २००७ मध्ये आदेश दिले होते. आम्ही २०१७ मध्ये कार्यवाही सुरू केली, पण कायदेशीर अडचणी येत होत्या. हे अतिक्रमण हटविण्याची शिवप्रेमींचीही मागणी होती. अफजल खानाच्या वधाच्या दिवशी शिवप्रतापदिनी ही कार्यवाही झाल्याबद्दल फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुटकेविषयी विचारता फडणवीस म्हणाले, न्यायालयाने निर्णय दिला असून तो योग्य की अयोग्य हे अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ठरवेल. ईडीने उच्च न्यायालयात दाद मागितली असून न्यायालयाच्या निर्णयानंतर मी बोलेन.
‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या संकल्पनेला आमचा पूर्ण पाठिंबा असून ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही आम्ही नियुक्त केली होती. स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभा अशा विविध निवडणुकांमुळे पाच वर्षांपैकी एक वर्ष राज्यात आचारसंहिता असते. त्यामुळे या सर्व निवडणुका एकत्रित व्हाव्यात. त्यामुळे खर्च वाचेल व मतदारांनाही भूमिका घेता येईल. राजकीय पक्षांनाही सोयीचे राजकारण करण्यापेक्षा एक भूमिका घेऊन जनतेपुढे जावे लागेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.