मुंबई : ‘आकाशवाणी’वरील ‘आरोग्यम् धनसंपदा’ या लोकप्रिय कार्यक्रमासह अनेक नभोनाट्यांच्या संकल्पनाकार, लोकप्रिय निवेदिका सुषमा हिप्पळगावकर यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती रवींद्र हिप्पळगावकर आणि दोन मुले असा परिवार आहे. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या सुवर्णकाळात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांच्या मनात घर केलेल्या उत्तम निवेदक, उद्घोषक यांच्यापैकी एक असलेल्या सुषमा हिप्पळगावकर यांच्या निधनाने आकाशवाणीच्या इतिहासातील आणखी एक सुवर्णपान हरवल्याची भावना व्यक्त होते आहे.
नागपूरमध्ये पत्रकार म्हणून कारकिर्दीची सुरूवात करणाऱ्या सुषमा हिप्पळगावकर त्यानंतर थोड्याच दिवसांत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात रुजू झाल्या. आकाशवाणीमध्ये असताना ‘वनिता मंडळ’, ‘आरोग्यम् धनसंपदा’, ‘साप्ताहिक स्वास्थ सेवा’ अशा अनेक कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली होती. घड्याळापेक्षाही आकाशवाणीच्या या कार्यक्रमांशी आपले वेळापत्रक जोडून ठेवलेल्या अनेक श्रोत्यांमध्ये सकाळी ७ ते ८ दरम्यान लागणारा ‘आरोग्यम् धनसंपदा’ हा छोटेखानी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला होता.
‘वनिता मंडळ’ हाही कार्यक्रम श्रोत्यांना आवडायचा. याशिवाय, आकाशवाणीसाठी अनेकविध नभोनाट्यांची निर्मिती हिप्पळगावकर यांनी केली होती. आकाशवाणी मुंबई केंद्रातून कार्यक्रम अधिकारी म्हणून त्या निवृत्त झाल्या. मात्र, आकाशवाणीच्या माध्यमातून केवळ आवाजरुपात लोकांपर्यंत पोहोचलेल्या सुषमा हिप्पळगावकर यांनी श्रोत्यांसाठी सादर केलेले कार्यक्रम, त्यांचा आवाज आकाशवाणीच्या चाहत्यांच्या मनात चिरंतन गुंजत राहील.