मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यावरुन घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी पुण्यातून पुन्हा एकदा ३ मेपर्यंतच्या अल्टिमेटमचा पुनरुच्चार केला आहे. त्यानंतर राजकीय पडसाद उमटताना दिसत असतानाच आता मुस्लीम समजातील संस्थांनीही परवानगी मिळवण्यासाठी पोलिसांकडे पत्रव्यवहार सुरु केलाय. आज मुंबईच्या पोलीस आयुक्तांना ऑल इंडिया सुन्नी जमायतुउल उलमाकडून पत्र पाठवून भोंग्यांसाठी परवानग्या मागण्यात आल्या तर त्या देण्यात याव्यात अशी मागणी केलीय.
नक्की वाचा >> “मशिदीवरील भोंगे काढण्याचा निर्णय देशातील कोणत्याही न्यायालयाने कधीही दिलेला नाही; त्यांनी असा एक तरी…”; राज यांना खुलं आव्हान
ऑल इंडिया सुन्नी जमायतुउल उलमा यांचे अध्यक्ष सय्यद मोनुउद्दिन अश्रफ यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना पत्र येऊन मशिदींवर भोंगे लावण्यासंदर्भात कोणी परवानगी मागण्यास आल्यास त्यांना परवानगी द्यावी अशी मागणी केलीय. भोंगा लावण्याच्या परवानग्या देण्याचा हक्क स्थानिक पोलिसांना द्यावा अशी मागणीही रजा अकदामीकडून करण्यात आलीय.
नक्की वाचा >> आता नाशिक पोलीस आयुक्तांनीच दिला ३ मेचा अल्टीमेटम; मनसेचा उल्लेख करत मशिदींच्या भोंग्यांबद्दल म्हणाले, “३ मे नंतर…”
मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस स्थानकांना अशा सूचना देण्यात याव्यात की मशिदींवर भोंगे लावण्यासंदर्भात परवानगी मागण्यास कोणी आल्यास त्यांना परवानगी देण्यात यावी. अजानला जास्तीत जास्त तीन मिनिटं लागतात. त्यात १५ शब्दच असतात. अजानला कोणाचा विरोध नाहीय. विषय केवळ भोंगे वापरण्याचा आहे. तर भोंगे वापरण हे कायद्याच्या अंतर्गत आणण्यासाठी पोलिसांनी सहकार्य करावं अशी मागणी करण्यात आल्याची माहिती रजा अकादमीचे सचिव सईद नूरी जनरल यांनी प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या व्हिडीओत दिलीय.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही भोंग्यांच्या प्रश्नावरुन वातावरण तापल्याने या प्रकरणाची दखल घेतलीय. भोंग्यासंदर्भात एकत्रित धोरण ठरवा असे आदेश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी हे धोरण ठरवावं असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितंल आहे. जातीय तेढ निर्माण केल्यास कठोर कारवाई करावी असेही आदेश त्यांनी दिले आहेत.
नक्की वाचा >> “राज ठाकरे भाजपाचा अनधिकृत भोंगा”; औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा
राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त एकत्रित बसून एक निर्णय घेणार घेतील, गाईडलाईन्स तयार करतील अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. पुढे ते म्हणाले की, “एक दोन दिवसात राज्यासाठी एकत्रित असं धोरण ठरवलं जाईल. मुंबईसह राज्यासाठी नोटीफिकेशन काढलं जाईल आणि त्यातून नियमावली जाहीर करण्यात येईल.”
“मी अनेकदा सांगितलं आहे की, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. जाणीवपूर्वक कोणाकडून प्रयत्न झाला तर आणि त्याच्यात तो दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल मग ती संघटना असो, व्यक्ती असो किंवा आणखी कोणीही असो,” असंही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.