शिवाजीपार्कचे नाव बदलून ते ‘शिवतीर्थ’ करावे या शिवसेनेच्या प्रस्तावास सर्वच विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. पण काहीही झाले तरी सभागृहात हा प्रस्ताव संमत करून घेऊच, असा दावा महापौर सुनील प्रभू यांनी केला.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आणि गटनेत्यांच्या बैठकीत शिवाजीपार्कच्या नामांतराची सूचना मांडली जाणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वच विरोधी पक्षांनी याला विरोध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३०० व्या जयंती निमित्ताने १९२७ साली ‘माहीम पार्क’चे ‘शिवाजी पार्क’ असे नामांतर करण्यात आले होते. त्याच शिवाजी पार्कचे आता ‘शिवतीर्थ’ नाव बदलण्याची सूचना शिवसेनेकडून करण्यात आली आहे. पालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने हा प्रस्ताव बहुमताने संमत करून घेऊन राज्य सरकारकडे पाठवणार असल्याचे महापौर सुनील प्रभू यांनी सांगितले.
पण विद्यमान मैदाने, मनोरंजन मैदाने आणि उद्याने यांना देण्यात आलेली भारतीयांची नावे बदलण्यात येऊ नयेत, असा ठराव मुंबई महापालिकेने ८ मे २००८ रोजी केला आहे. त्यामुळे शिवसेनेने घेतलेली भूमिका चुकीची असून त्याला आम्ही सभागहात कडाडून विरोध करू, असे मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बहुमताच्या जोरावर शिवसेनेने हा ठराव संमत करून घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही या नामांतराला विरोध केला आहे.
या पाश्र्वभूमीवर भाजपाने मात्र आपले पत्ते अजून उघडे केलेले नाहीत. यासंदर्भात दिलीप पटेल यांना विचारले असता प्रस्ताव आल्यानंतर आमची भूमिका स्पष्ट करू, असा सावध पवित्रा त्यांनी घेतला.

Story img Loader