मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत मतांचे गणित जुळविण्यासाठी राजकीय पक्ष आणि उमेदरावांची धावपळ सुरू आहे. कोणत्याच पक्षाकडे अतिरिक्त मते नसल्याने मतांच्या फोडाफोडीवर साऱ्यांनीच भर दिला आहे. आमदार आपल्या नजरेखाली राहावेत या उद्देशानेच सर्व पक्षांनी आपापल्या आमदारांना शनिवारपासून मुंबईत पाचारण केले आहे.

राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या धक्कातंत्रामुळे महाविकास आघाडीचे नेते गारद झाले. त्यातच पाचही उमेदवार विजयी होतील, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने महाविकास आघाडीत चिंतेचे वातावरण आहे. यामुळेच शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी मतांची जुळवाजुळव करण्यावर भर दिला आहे.  राज्यसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना व राष्ट्रवादीकडे अतिरिक्त मते होती. विधान परिषदेत मात्र कोणत्याच राजकीय पक्षांकडे अतिरिक्त मते शिल्लक उरत नाहीत. त्यातच पहिल्या व दुसऱ्या पसंतीची मते आपापल्या उमेदवारांना राजकीय पक्षांना द्यावी लागतील. विजयाकरिता पहिल्या पसंतीच्या २६ मतांची आवश्यकता असेल. त्या दृष्टीनेच सर्व पक्ष २६ मतांचे गणित जुळविण्यावर कामाला लागले आहेत.

गुप्त मतदान पद्धतीमुळे सर्वच उमेदवारांना मते फोडण्यास वाव आहे. अपक्ष व छोटय़ा पक्षांच्या २९ आमदारांबरोबरच राजकीय पक्षांचे आमदारही गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यातूनच शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते सावध झाले आहेत. आघाडीच्या घटक पक्षांचे आमदार तरी परस्परांनी फोडू नयेत, अशी अपेक्षा तीन पक्षांनी एकमेकांजवळ व्यक्त केली आहे. अनिल देशमुख व नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार न मिळाल्यास राष्ट्रवादीची मदार ही अपक्षांवर असेल.

दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात चुरस आहे. मात्र उभयतांचे सर्व पक्षांमध्ये असलेले संबंध व दोघांची आर्थिक ताकद लक्षात घेता या दोघांपेक्षा राजकीय पक्षाच्या एखाद्या उमेदवाराला फटका बसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

एकनाथ खडसे सावध

माजी मंत्री एकनाथ खडसे हे भाजपचे लक्ष्य असतील हे निश्चितच. त्यातूनच स्वत: खडसे आणि राष्ट्रवादीचे नेते सावध झाले आहेत. भाजपमधील काही मते खडसे यांना मिळतील, असा दावा राष्ट्रवादीतून केला जात आहे. खडसे यांना मानणारे आमदार भाजपमध्ये आहेत. ते नक्कीच खडसे यांना मते देतील, असे सांगण्यात येत आहे. राज्यसभा निवडणुकीत दुसरी जागा गमवावी लागल्याने शिवसेनेने अधिकच सावधता बाळगली आहे. दोन्ही उमेदवारांना पुरेशी मते मिळतील या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

क्षितिज ठाकूर अमेरिकेत

वसई : ऐन निवडणुकीच्या तोंडावर बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर हे अमेरिकेत गेले असून, २० जूनपर्यंत ते परतण्याची शक्यता कमी आहे. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार असून त्यांच्या मतांकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. त्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांच्यापाठोपाठ गुरुवारी राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आणि मतदान करण्याची विनंती केली. नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर अचानक कौटुंबिक कारणासाठी अमेरिकेला गेले आहेत. ते रविवापर्यंत परतण्याची शक्यता कमी आहे. आम्हाला कुटुंबालाही वेळ द्यावा लागतो. कुटुंबातील एका व्यक्तीच्या वैद्यकीय उपचारासाठी ठाकूर अमेरिकेला गेले आहेत, अशी माहिती हितेंद्र ठाकूर यांनी दिली.

Story img Loader