मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करत सोमवारी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. दुसरीकडे सुमारे तासभर झालेल्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे (अप) अध्यक्ष अजित पवार यांनी चौकशीत अद्याप कोणाचेच नाव पुढे नसल्याचे सांगत मुंडे यांना अभय दिले.

मुंडे यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची सोमवारी भेट घेतली. मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला असतानाच सोमवारी सायंकाळी मुंडे यांनी अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली. सुमारे तासभर उभयतांमध्ये खलबते झाली. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येची विशेष चौकशी पथक, बीड पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. याशिवाय न्यायालयीन चौकशीची घोषणा झाली आहे. जेव्हा-केव्हा चौकशीत नावे समोर येतील तेव्हा कारवाई करू, असे सांगत अजित पवारांनी मुंडे यांना एका अर्थी अभय दिले.

हेही वाचा >>>अंधेरीत १३ मजली इमारतीला भीषण आग; आगीचे गांभीर्य वाढले

भाजपची तिरकी चाल

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुंडेंविरोधात आघाडी उघडली आहे. अंजली दमानिया यांनी आपल्याला मुंडे समर्थकांकडून धमक्या येत असल्याचा आरोप केला. त्यावरून अजित पवार गटाचे नेेते दमानियांना लक्ष्य करीत असतानाच धमक्या देणऱ्यांविरोधात कारवाईची मागणी भाजप महिला विभागाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांनी पोलीस सहआयुक्तांकडे केली. धस यांचे आरोपांचे सत्र आणि वाघ यांची भूमिका म्हणजे भाजपची तिरकी चाल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

तीन यंत्रणांकडून स्वतंत्रपणे या हत्येची चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंतच्या चौकशीत कोणाचीच नावे पुढे आलेली नाहीत. जोपर्यंत कोणावर ठपका ठेवला जात नाही तोपर्यंत कारवाई कशी करणार? – अजित पवार, उपमुख्यमंत्री व अध्यक्ष, राष्ट्रवादी (अप)

Story img Loader