अंत्ययात्रेला विलंब झाल्याने अखेर सर्वपक्षीय नेत्यांनी महापौर बंगल्यावर ‘क्षणभर विश्रांती’ घेणे पसंत केले. शिवसेनेचे खासदार, आमदार तसेच नगरसेवक आगोदरच बंगल्यावर ठिय्या देऊन होते. परंतु सर्वपक्षीय नेते तेथे येऊ लागल्यानंतर या सर्वानी हळूहळू काढता पाय घेत पाहुण्यांची सरबराई सुरू केली. हा हा म्हणता महापौर बंगल्याचे आवार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमनाने भरून गेले.
शिवतीर्थावर साधारणत: १२ वाजेपर्यंत अंत्ययात्रा पोहोचेल, अशा बेताने राजकीय नेत्यांची लगबग सुरू झाली होती. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी खास मंडप तयार करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात अंत्ययात्रा पोहोचण्यासाठी आणखी काही तासांचा कालावधी लागेल हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी दिग्गजांचा ताफा महापौर बंगल्याच्या दिशेने वळविला. त्यामुळे महापौर बंगल्यात सर्वपक्षीय नेत्यांची गर्दी जमू लागली होती. महापौर बंगल्यातील सर्वच कक्षांमध्ये अतिमहत्त्वांच्या व्यक्तींचा वावर सुरू झाला. लालकृष्ण अडवाणी, शरद पवार, नितीन गडकरी, सुषमा स्वराज, अरूण जेटली, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, रामदास आठवले आदी अनेक नेतेमंडळी बंगल्यात जमू लागले होते. या सर्वाच्या चर्चेचा विषय एकच होता तो म्हणजे शिवसेनाप्रमुख. त्यांचा स्वभाव, त्यांच्याबद्दलचा अनुभव. गप्पांच्या मैफिली झडत होत्या. विविध राजकीय पक्षांचे नेते, खासदार, आमदार महापौर बंगल्याचाच आश्रय घेत होते. पवार २ वाजल्यापासून आले होते. थेट दिल्लीहून ते बंगल्यावर आले होते.
त्यामुळे त्यांच्यासाठी बंगल्यावरील कर्मचाऱ्यांनी नाष्टा देऊ केला. परंतु त्यांनी त्यास विनम्रपणे नकार दिला. त्यामुळे इतर नेत्यांनाही नकारार्थी मान डोलवावी लागली. तोपर्यंत राष्ट्रवादीच्या खासदार-आमदारांनीही मग महापौर बंगल्याकडे आपला मोर्चा वळविला.