महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सुगंधी दुधाची बाधा होत असल्यामुळे त्याचा पुरवठा बंद करावा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारी शिक्षण समितीच्या बैठकीत केली. तर दुधाऐवजी प्रोटीनयुक्त चिक्की अथवा राजगिरा लाडू द्यावा, अशी मागणी समितीचे अध्यक्ष विठ्ठल खरटमोल यांनी केली.
शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पावर भाषण करताना खरटमोल म्हणाले की, पौष्टिक आहार म्हणून विद्यार्थ्यांना सुगंधी दुधाचा पुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र काही विद्यार्थ्यांना दुधाची बाधा होण्याच्या घटना घडल्या होत्या. सुगंधी दुधाचा पुरवठा करण्यासाठी माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांकरीता ११४.३२ कोटी रुपये, तर प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी १७.६९ कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. प्रशासनाने या घटनांची दखल घेऊन सुगंधी दुधाचा पुरवठा कायमस्वरुपी बंद करावा. पर्याय म्हणून विद्यार्थ्यांना प्रोटीनयुक्त चिक्की अथवा राजगिरा लाडू द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यास सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला.
विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी त्यांना २७ शालोपयोगी वस्तू देण्याची योजना पालिकेने हाती घेतली होती. मात्र कंत्राटदार चढय़ा भावाने या वस्तूंचा पुरवठा करीत असून विद्यार्थ्यांना त्या विलंबाने मिळत असल्यामुळे आता त्याचे पैसे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या बँकेतील खात्यावर जमा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र त्यास शिक्षण समितीच्या अध्यक्षांनीच विरोध दर्शविला आहे.
शालेय विद्यार्थ्यांना २०१२-१३ आणि २०१३-१४ या वर्षांमध्ये २७ शालोपयोगी वस्तूंच्या वाटपासाठी स्थायी समिती आणि पालिका सभागृहाने मंजुरी दिली आहे. या योजनेत अंशत: बदल करावयाचा असेल तर गटनेत्यांच्या बैठकीत मान्यता घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे सादर करावा. त्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतरच त्याची अंमलबजावणी करावी, असे खरटमोल यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा