उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इंदापूर येथील सभेतील दुष्काळग्रस्त व भारनियमनग्रस्त जनतेचा अवमान करणाऱ्या बेताल वक्तव्याचा विविध राजकीय पक्षांकडून तीव्र निषेध करण्यात आला. सध्या सुरु असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. आपलेच वक्तव्य आपल्याच अंगावर उलटते आहे, असे लक्षात येताच अजित पवार यांनी जनतेची माफी मागून आता सारवासारव करण्याचे प्रयत्न चालविले आहेत.
इंदापूरमध्ये आयोजित केलेल्या एका सभेत अजित पवार यांनी मुंबईत पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ातील शेतक ऱ्यांची अत्यंत असभ्य भाषेत खिल्ली उडविणारे वक्तव्य केले. भारनियमनाबाबतही त्यांनी असेच बेताल विधान केले. त्याचा सर्वत्र तीव्र निषेध करण्यात येत आहे.
सत्तेत राहिल्यानेच अजित पवारांचा विवेक हरविला आहे, त्यातूनच त्यांच्या तोंडून अशी मस्तवाल भाषा बाहेर पडत आहे, अशा शब्दात भाजपचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी टीका केली आहे. दुष्काळग्रस्तांचे प्रश्न सोडविता येत नसतील राहु द्या, परंतु त्यांची क्रूर चेष्ठा करणारी विधाने करणे अतिशय धिकारार्ह आहे, असे त्यांनी म्हटले आहे.  
विधान परिषदेतील विरोधी पक्षनते विनोद तावडे यांनी सत्तेचा माज किती असतो हेच अजित पवारांच्या वक्तव्यातून दिसले, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. पवारांचे हे विधान संतापजनकच नव्हे तर महाराष्ट्राला शरमने मान खाली घालायला लावणारे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पोलिस कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीप्रकरणी आमदारांची कानउघाडणी करणारे शरद पवार अजित पवारांच्या वक्तव्यावर गप्प का, असा सवालही त्यांनी केला. दुष्काळग्रस्त जनतेची अशी बेताल वक्तव्ये करुन क्रूर चेष्टा करणारा या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री कसा असू शकतो, अशा शब्दात प्रदेश भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी अजित पवारांवर टीका केली. भाजपचे प्रदेश अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. दुष्काळ व भारनियमाने त्रस्त झालेल्या जनतेची अशी खिल्ली उडविणारे विधान करणाऱ्या पवारांचा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी तीव्र शब्दात निषेध केला. पाण्यासाठी तडफडणाऱ्या जनतेची अश्लिल भाषेत क्रूर चेष्टा करणाऱ्या अजित पवार यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब काढून टाका, अशी मागणी जनता दलाचे प्रवक्ते अ‍ॅड. रेवण भोसले यांनी केली आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा