मुंब्रा-शीळ येथील दुर्घटनेनंतर ठाणे शहरातील बेकायदा तसेच धोकादायक बांधकामांविरोधात कारवाईचे हत्यार उगारणाऱ्या ठाणे महापालिकेस राजकीय नेते तसेच रहिवाशांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. सोमवारी वागळे भागातील बेकायदा इमारत पाडण्यास गेलेल्या पालिकेच्या पथकाला शिवसेनेचे आमदार एकनाथ िशदे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या जोरदार विरोधामुळे हात हलवत माघारी फिरावे लागले. दरम्यान, ठाणे, कळवा, मुंब्रा भागातील बेकायदा इमारतींमधील ‘व्होटबॅंक’च्या राजकारणावर स्वत:ची पोळी भाजून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये अहमहमिका लागली असून, तेथील रहिवाशांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ‘ठाणे बंद’ पुकारण्याची तयारी सुरू केली आहे.
शीळ येथील दुर्घटनेनंतर ठाणे पालिकेने सोमवारी सलग चौथ्या दिवशी मुंब्रा भागात बेकायदा इमारतींविरोधात कारवाई सुरू ठेवली. यावेळी मुंब्रा परिसरातील पाच, तर डायघर, भोलेनाथनगर, सम्राटनगर, मुंब्रा रेल्वे स्थानक, ठाकूरपाडा या भागांतील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आली. मुंब्रादेवी रोड परिसरातील नदीम अर्पाटमेन्ट या अतिधोकादायक इमारतीवर कारवाईसाठी गेलेल्या पथकाला तेथील ३५ कुटुंबांच्या प्रखर विरोधाला सामोरे जावे लागले. इमारतीच्या संरचनात्मक परीक्षणासाठी १५ दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी या रहिवाशांनी केली.
ही मागणी मान्य करत महापालिकेने कारवाई मागे घेतली. वन विभागाने सुरू केलेल्या कारवाईमुळे धास्तावलेल्या डायघरमधील रहिवाशांनी सोमवारी सकाळी तेथे ठिय्या आंदोलन केले.
नेत्यांचा विरोध, पालिका हतबल
ठाण्यातील सर्वपक्षीय नेते या कारवाईविरोधात रस्त्यावर उतरू लागल्याने येत्या काळात हा संघर्ष आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वागळे भागातील पडवळनगर येथील एका धोकादायक बेकायदा इमारतीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला या भागातील आमदार एकनाथ िशदे यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे नेते रवींद्र फाटक तसेच पालिकेतील विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांनीही कारवाईविरोधात आक्रमक भूमिका घेतली. नेत्यांच्या विरोधापुढे हतबल झालेल्या पालिकेच्या पथकाने कारवाई थांबविण्याचा निर्णय घेतला.

Story img Loader