शीळ भागात गुरुवारी झालेल्या दुर्घटनेनंतर सर्वच राजकीय पक्षांनी अनधिकृत बांधकामांविरोधात पद्धतशीरपणे गळा काढण्यास सुरुवात केली असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीसह ठाणे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांचे बालेकिल्लेही अनधिकृत बांधकामांचे आगार बनल्याचे चित्र अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जुन्या ठाण्यासह कोपरी, वागळे, वर्तकनगर, घोडबंदर परिसराला अनधिकृत बांधकामांनी यापूर्वीच आपल्या कवेत घेतले असले, तरी मुंब्रर्यापलीकडे झपाटय़ाने विकसित होत असलेले शीळ, दातीवली, डायघर, साबे, दिवा ही अनधिकृत बांधकामांची नवी ठाणी ठरू लागली आहेत. विशेष म्हणजे, मुंब्रा-कौसात इंच-इंच जागेवर अनधिकृत बांधकामे उभी केल्यानंतर आता नवी बांधकामे उभी करण्यासाठी जागाच शिल्लक नाही, अशी परिस्थिती आहे. असे असताना शीळ, दातीवली, दिव्यात बिनधोकपणे बांधकामे उभी राहत असताना राष्ट्रवादीच नव्हे तर सर्वच प्रमुख पक्षाचे शागीर्द या बांधकामांचे ‘तारणहार’ म्हणून वावरू लागले आहेत.
गुरुवारच्या दुर्घटनेमुळे अनधिकृत बांधकामासाठी मुंब्रा परिसर सर्वाधिक चर्चेत आला. प्रत्यक्षात ही दुर्घटना घडली ती जागा मुंब्रा, कौसाच्या पलीकडे शीळजवळ आहे. मुंब्रा-कौसातील जवळपास ९० टक्के बांधकामे अनधिकृत आहेत. त्यामुळे नव्याने विकसित होणाऱ्या या शहरांच्या पलीकडील परिसराचा विकास तरी नियोजनबद्ध व्हावा, अशी अपेक्षा या भागातील नियोजनकर्ते बाळगून आहेत. प्रत्यक्षात कल्याणजवळ शीळ-कल्याण रस्त्यावर उभी राहत असलेली ही नवी उपनगरे अनधिकृत बांधकामांनी केव्हाच आपल्या कवेत घेतली आहेत.
विशेष म्हणजे, हे सर्वच राजकीय पक्षांच्या डोळ्यादेखत सुरू आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंब्रा, कौसा पट्टय़ात आव्हाड यांना मानणाऱ्या नगरसेवकांची सद्दी चालते, तर नव्याने होत असलेल्या अनधिकृत बांधकामाचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवा, दातीवली, साबे, डायघर या पट्टय़ात शिवसेनेसह, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक आमदार, नगरसेवकांची चलती आहे. शीळ येथील लकी कंपाउंडचा परिसर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार रमेश पाटील यांच्या हद्दीत येत असला तरी या भागातील राष्ट्रवादीचे नगरसेवक हिरा पाटील हे पुन्हा आव्हाड यांच्या गळ्यातले ताईत मानले जातात. दिवा, शीळ, खर्डी रोड, डायघर, साबे, दातीवली रोड, चाँद नगर, दौलतनगर, पडले गाव, कौसा हा सगळा परिसर नव्याने होत असलेल्या अनधिकृत बांधकामांचे आगर मानला जातो. या सगळ्या पट्टयात आव्हाडांसह पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आमदार सुभाष भोईर, मनसेचे स्थानिक आमदार रमेश पाटील यांचा वरचष्मा दिसून येतो. दिवा गावातील दोन प्रभागांमध्ये पूर्वी शिवसेनेचे नगरसेवक होते, तर आता हा प्रभाग मनसेचा बालेकिल्ला आहे. येथील गावांच्या वेशीवर उभ्या राहत असलेल्या बांधकामांविरोधात आमदार, नगरसेवक तक्रारी करत नाही, असेही नाही. मात्र, बांधकामांच्या प्रमाणात या तक्रारी तशा तुरळकच असतात, असे दिसून आले आहे. त्यामुळे दिवा, दातीवली, डायघर भागात पोसल्या जाणाऱ्या अनधिकृत बांधकामांमध्ये या पक्षांचे व्होटबँकेचे राजकारण नसेल, याची शाश्वती कोणालाही देता येणार नाही.    
आव्हाडांना उशिरा सुचलेले शहाणपण
अनधिकृत बांधकामांना अभय देणारे राजकारणी, महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांची अभद्र युती सध्या टिकेचा विषय ठरली असतानाच शनिवारी कळवा-मुंब््रयाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या भागातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक बोलावून वाढत्या अनधिकृत बांधकामप्रकरणी या नगरसेवकांची शाळा घेतल्याने आव्हाडांना उशिरा सुचलेले हे शहाणपण महापालिका वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. ‘आपल्या प्रभागातील अनधिकृत बांधकामांची यादी आयुक्तांना सादर करा. काही अघटित घडले तर माझ्याकडे येऊ नका. तुमच्या प्रभागातील नागरिकांना मालमत्ता कर भरायला प्रवृत्त करा. झाले तेवढे पुरे. यापुढे अनधिकृत बांधकामे होऊ देऊ नका’, असा दम आव्हाड यांनी नगरसेवकांना भरला. मात्र हे काम आव्हाडांनी यापूर्वीच करायला हवे होते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Story img Loader