विद्यार्थी वाऱ्यावर; आठ दिवस भरपगारी रजा घेऊन शिक्षकांचे..
सरकार कोणाचेही असले तरी संघटनेच्या नावाखाली सुरू असलेल्या शिक्षण क्षेत्रातील काही चुकीचे पायंडे अजूनही कायम आहेत. सद्यस्थितीत राज्यभरातील शाळांमधील विद्यार्थी-पालक त्याचा अनुभव घेत आहेत. कारण अधिवेशनाच्या नावाखाली तब्बल आठवडाभराची भरपगारी सुटी पदरात पाडून घेण्याची संधी शिक्षकांना मिळाली आहे. शिक्षकांच्या या सर्वअधिवेशन अभियानामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे मात्र नुकसान होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेसशी बांधिलकी सांगणाऱ्या ‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघा’चे राज्यस्तरीय अधिवेशन ६ फेब्रुवारीला नवी मुंबईतील पटनी मैदानावर भरणार आहे. त्याकरिता १ ते ६ फेब्रुवारीपर्यंतची जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका व खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक-मुख्याध्यापकांना विशेष नैमित्तिक रजाच मंजूर करण्यात आली आहे. त्यासाठी महत्त्वाची अट एकच, अधिवेशनात सहभागी झाल्याचे पत्र पुरावा म्हणून सरकारकडे जमा करायचे! त्यासाठी संघटनेकडे सदस्यत्वाकरिता ६०० रुपयांची पावती फाडायची आणि त्या मोबदल्यात अधिवेशनात सहभागी झाल्याचे पत्र घरपोच मिळवायचे. त्यामुळे ही अधिवेशने संघटनांकरिताही पैसे कमाविण्याचे साधन ठरली आहेत. आताही सुट्टय़ांच्या हव्यासापोटी अडीच ते तीन लाख शिक्षकांनी पावत्या फाडल्याचे समजते. अर्थात इतके शिक्षक सुट्टय़ा मिळवित असले तरी प्रत्यक्षात अधिवेशनाच्या ठिकाणी शिक्षकांची फारच थोडी उपस्थिती असते. म्हणजे शाळेतही दांडी आणि अधिवेशनालाही फिरकायचे नाही, अशी अनिष्ट प्रथा गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात सुरू झाली आहे. दुर्दैवाने सरकार बदलले तरी ही कुप्रथा सुरूच असल्याची तक्रार जालन्यातील एका शिक्षकाने केली.
आपली गाडी ठरवली ना? गेल्या वर्षी याच संघटनेच्या अधिवेशनाच्या नावाखाली शिक्षक महाबळेश्वरला हवापालट करून आले होते.

सर्व पक्षीय नेत्यांची मांदियाळी
अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार, नवी मुंबईचे पालक मंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे, गणेश नाईक आदी नेते उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांतर्फे करण्यात आला आहे.
अधिवेशनांमध्ये शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हाने, प्रश्न, अडचणी यांवर साधकबाधक चर्चा होणे अपेक्षित असते. त्यामुळे, अशी अधिवेशने दिवाळी किंवा उन्हाळी सुटीतही घेता येतात. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत नाही. आम्ही हे बंधन गेली अनेक वर्षे कसोशीने पाळत आहोत. शाळेच्या दिवसांत अधिवेशन भरविणे आम्हाला रूचत नाही. इतरही संघटनांनी हे भान ठेवायला हवे.
– प्रशांत रेडीज, प्रवक्ते,
राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ

आम्ही महिनाभर दररोज एक तास जादा वर्ग घेऊन तसेच शनिवारी पूर्ण वेळ शाळा भरवून मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान भरून काढणार आहोत.
– बाळकृष्ण तांबारे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All session campaign in mumbai