मुंबईतील अत्याचाराची घटना दुर्दैवी आणि निंदाजनक असून पीडित तरुणीस सर्वप्रकारची मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. तर महिलांच्या सुरक्षेसंदर्भात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी सायंकाळी आपल्या पत्नीसमवेत जसलोक रूग्णालयात जाऊन पीडित तरुणीची विचारपूस केली. तसेच तिच्या कुटुंबियांनाही धीर दिला. या मुलीच्या औषधोपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असून पुढील काळातही तिला लागणारी सर्वतोपरी मदत केली जाईल असे चव्हाण यांनी सांगितले. भविष्यातही तिला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येवू नयेत यासाठी तिची ओळख गोपनीय ठेवण्याचे आदेश त्यांनी सबंधितांना दिले. या घटनेबद्दल दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या असून गृहमंत्र्यामार्फत सतत पाठपुरावा केला जात आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासनाने कठोर पावले उचलेली आहेत असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अजित पवार व्यथित!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. या घटनेतील सर्व आरोपींना तातडीने अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई होईल याकडे व्यक्तीश: लक्ष ठेवण्याचे निर्देश गृहमंत्र्यांना दिल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातील जनतेची विशेषत: माता-भगिनींची सुरक्षा हा आपल्यासाठी सर्वात चिंतेचा आणि प्राधान्याने सोडविण्याचा विषय असून पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असे कालच पोलिसांना आदेश देण्यात आले होते.
कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करुन पीडित तरुणीला आवश्यक ती सर्व मदत शासनातर्फे देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आरोपीला बघताच ‘तो’ अंगावर धावला..
मुंबई: महिला छायाचित्रकारावरील बलात्कारप्रकरणी एका आरोपीला शुक्रवारी पोलीसांनी जेरबंद करून ठाण्यात आणले, आणि त्याला पाहताच पीडित तरुणीसोबतचा तिचा सहकारी संतप्त होऊन आरोपीच्या अंगावर धावून गेला. या सहकाऱ्याला बलात्कार करणाऱ्या आरोपींनी मारहाण करून बांधून ठेवले होते. आरोपींना पकडण्याकरिता त्या महिलेबरोबरच तिच्या सहकाऱ्याची मदत घेण्यात आली. छायाचित्रकार असल्याने त्याच्या मदतीने आरोपींची हुबेहुब रेखाचित्रे काढणे पोलिसांना शक्य झाले होते. पोलिसांनी गुन्हेगारांची छायाचित्रे दाखविली असता त्यातील दोघांना त्याने ओळखले होते. गुरुवारी सकाळी पकडलेल्या आरोपीची ओळख पटविण्यासाठी त्या तरुणाला पाचारण करण्यात आले. आरोपीला बघताच तो तरुण संतप्त झाला आणि त्याला मारण्यासाठी अंगावर धावून गेला.
पोलिसांसाठी रात्र वैऱ्याची..
छायाचित्रकार तरुणीवर सामूहिक बलात्काराची माहिती मिळताच मुंबई पोलीस दल हादरले होते. रातोरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले. पीडित तरुणीचा आणि तिच्या सहकाऱ्याचा जबाब घेतल्यानंतर पोलिसांना घटनेचे गांभीर्य उमगले. घरी परतलेल्या अधिकाऱ्यांना रातोरात बोलावून घेण्यात आले. देशपातळीवर हे प्रकरण गेल्याने पोलिसांची झोप उडाली. घटना पूर्वनियोजित नव्हती त्यामुळे आरोपी स्थानिक असावेत एवढाच धागा पोलिसांकडे होता आणि केवळ त्याच आधारावर पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली होती. जर आम्ही आरोपीला पकडले नसते तर शुक्रवार पर्यंत आमची विकेट गेली असती असे एका अधिकाऱ्याने सांगितले.