मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असून शहरातील सकल भागात पाणी साचले आहे. या पावसाचा फटका रेल्वे व रस्ते वाहतुकीला बसला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील महापालिका, शासकीय, खाजगी माध्यमांच्या सकाळच्या सत्रात शाळांना सुट्टी जाहीर केली होती. आता दुपारच्या सत्रातील शाळांना तसेच महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आल्याचे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मुंबई महानगरात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच, आज दुपारी १.५७ वाजता समुद्रात ४.४० मीटर उंच भरती आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सकाळच्या व दुपारच्या सत्रातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.