आम्ही गर्दीवर अवलंबून नाही, शिवसेनेशी निष्ठा असलेले आमच्या मेळाव्याला येतीलच, आम्ही आतापर्यंत नेहमीच गर्दीचा विक्रम मोडत आलो आहोत. मात्र शिंदे गटाच्या मेळाव्याला भाजपची पाठवलेली माणसे, कंत्राटदारांची माणसे यांचीच गर्दी असेल अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी टोला लगावला आहे.दसरा मेळाव्यावरून शिवसेनेच्या दोन गटात गेल्या काही दिवसांपासून कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. सर्वाधिक गर्दी खेचण्याचा दोन्ही गटाचा प्रयत्न आहे. बीकेसीवरील मेळाव्याला लाखोंच्या संख्येने शिवसैनिक येतील, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे.या पार्श्वभूमीवर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना वरील विधान केले आहे. शिवाजी पार्क येथील मेळाव्याला निष्ठावंतांची गर्दी असेल असे सांगतानाच शिंदे गटाच्या मेळाव्याला भाजपची माणसे, कंत्राटदारांची माणसे यांचीच गर्दी असेल असा टोला पेडणेकर यांनी लगावला आहे. पेडणेकर यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. शिंदे यांच्याकडे लाखो शिवसैनिकांची गर्दी असती तर चाळीस आमदार आपापल्या मतदार संघात सभा घेतात तेव्हा खुर्च्या का रिकाम्या असतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा >>> वीसपेक्षा अधिक गुन्ह्यात सहभागी आरोपीला अटक

शिवसेनेच्या सभांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी असते, असा आरोप शिंदे गटाकडून केला जात असल्याचा आरोपावर बोलताना त्या म्हणाल्या, दसरा मेळाव्याला पक्षप्रमुख काय बोलतात हे ऐकण्यासाठी सर्वच पक्षांचे कार्यकर्ते शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर बसलेले असतात. त्यात नवीन काही नाही. काहींच्या सभेला लाखोंच्या संख्येने लोक येतात, टाळ्या, शिट्टया वाजतात पण त्याचे मतात रुपांतर होत नाही, त्यांचे उमेदवार जिंकून येत नाहीत असे मनसेचे नाव न घेता पेडणेकर म्हणाल्या.

हेही वाचा >>> मुंबईः मृत भावाच्या ठेवी हडप केल्याच्या आरोपाखाली महिलाविरोधात गुन्हा

भाजप नेते आशिष शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत अनेक ठिकाणी शुभेच्छांचे फलक लावण्यात आले आहेत. या फलकावर १५0 मिशन असे लिहिण्यात आले आहे. त्यावर नुसते फलक लावून महापालिकेत १५० जागा मिळत नाहीत. त्यासाठी जनतेशी नाळ जुळलेली असावी लागते. राष्ट्रवादी काँग्रेसने फलक लावून उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला पाठिंबा दिला आहे. यावर राष्ट्रवादी, काँग्रेस असे बघण्यापेक्षा बाळासाहेब यांचा खरा वारसा कोण चालवत आहे हे सगळ्यांना कळते आहे, त्यामुळे प्रत्येकजण उद्धव ठाकरे यांना पाठींबा देत आहे, असे त्या म्हणाल्या.

Story img Loader