गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे मंत्रिमंडळात एकाकी पडल्या आहेत का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे.
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर १९१ कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर त्याचा खुलासा करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला तावडे यांच्यासह अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. या तिघांनी मिळून तावडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले. मात्र, त्याच्या दुसरय़ाच दिवशी पंकजा मुंडे यांनी आरोपांसंदर्भात खुलासा करण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेला भाजपचे अन्य कोणीही मंत्री उपस्थित नसल्यामुळे त्या एकाकी पडल्या आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला. वृत्तवाहिन्यांनी यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध केल्यावर पत्रकार परिषद संपायला येताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता तिथे पोहोचले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या अमेरिकेच्या दौऱयावर आहेत. त्याचवेळी भाजपच्या मंत्र्यांमध्ये एकी आहे की नाही, अशी शंका उपस्थित झाली आहे. तावडेंवरील आरोपांच्या खुलाशासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला तीन मंत्री आणि पंकजा मुंडे यांच्यावरील आरोपांसंदर्भात खुलासा करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला एकही मंत्री नसल्यामुळे पक्षामध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allegations explanation by vinod tawde pankaja munde