‘‘मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यामुळे खंडणीचे उद्योग करत नाही. माझे दैवत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची व माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो की, सचिन वाझे यांच्या पत्रातील आरोप खोटे आहेत, असे भावनिक स्पष्टीकरण परिवहनमंत्री अनिल परब यांनी बुधवारी दिले. मला आणि शिवसेनेला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून, सत्य समोर यावे यासाठी नार्को चाचणीलाही तयार आहे, असे परब यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर के ले.

सचिन वाझे यांनी ‘एनआयए’ला दिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावरही आरोप के ल्यानंतर परब यांनी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली. तिसरी विकेट काढणार, असे गेल्या दोन दिवसांपासून भाजप नेते म्हणत होते. याचा अर्थ दोन दिवसानंतर सचिन वाझे पत्र देणार हे त्यांना आधीच माहिती होते, असे नमूद करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करा, असे हे भाजपचे कारस्थान आहे. त्यातूनच ‘एनआयए’मार्फ त वाझे यांच्याकडून पत्र लिहून घेण्याचे कथानक भाजपने रचले. माझ्यासह महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा हा डाव आहे. त्यामुळे सत्य समोर यावे, यासाठी कु ठल्याही चौकशीला माझी तयारी आहे. त्यासाठी माझी नार्को चाचणी करण्याचीही तयारी आहे, असे अनिल परब यांनी सांगितले. सैफी ट्रस्टकडून मी पैसे घेण्यास सांगितले आणि जानेवारी २०२१ ला मुंबई पालिकेच्या कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना त्यांना दिल्या, असे दोन आरोप सचिन वाझे यांनी के ले आहेत. या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत. मी ते आरोप फे टाळत आहे. मी सच्चा शिवसैनिक आहे. माझ्यावर खंडणीचे कोणतेही संस्कार नाहीत. जूनमध्ये व जानेवारीमध्ये मी हे सांगितल्याचा आरोप सचिन वाझे करतात. मग इतक्या दिवसांत तक्रार का के ली नाही. परमबीर सिंहांच्या पत्रात या गोष्टींचा उल्लेखही नाही, याकडेही परब यांनी लक्ष वेधले. त्यामुळे एनआयए, सीबीआय, नार्को अशा कोणत्याही चौकशीला सामोरा जायची माझी तयारी आहे, असे अनिल परब म्हणाले.

सचिन वाझेंच्या पत्रात काय?

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर आरोप करणारे पत्र न्यायालयात सादर केले. ‘‘आपल्याला पोलीस दलात सहभागी करून घेतल्यानंतर काही ठिकाणी निदर्शने झाली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा निलंबित करण्याचे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दूरध्वनी संभाषणाद्वारे दिली होती. मी पवार यांचे मतपरिवर्तन करतो, मात्र त्या बदल्यात दोन कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी देशमुख यांनी केली. असमर्थता दर्शवताच देशमुख यांनी नंतर सावकाश द्या’’, असे सांगितल्याचा दावा वाझे यांनी पत्रात केला. या वर्षी जानेवारी महिन्यात देशमुख यांनी शासकीय निवासस्थानी बोलावून शहरातील १६५० बारकडून प्रत्येकी तीन ते साडेतीन लाख रुपये गोळा करण्यास सांगितल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे. मंत्री परब यांनी  ‘एसबीयुटी’च्या(सैफी बुºहाणी अप लिफ्टमेंट ट्रस्ट) विश्वास्तांविरोधात प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती दिली. ही चौकशी बंद करण्याच्या मोबदल्यात ५० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव विश्वास्तांसमोर ठेवण्यास सांगितले. तसेच महापालिकेच्या कंत्राटदारांविरोधात निनावी तक्रारीवर ‘सीआययू’कडून चौकशी सुरू होती. परब यांनी यातील ५० कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप वाझे यांनी या पत्रात केला आहे.

Story img Loader