लाचप्रकरणी तक्रार केल्यामुळे कथित अमलीपदार्थ प्रकरणात गोवल्याचा आरोप चकमकफेम पोलीस अधिकारी दया नायक यांच्यावर याचिकेद्वारे करण्यात आला आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. न्यायालयाने या याचिकेची दखल घेतली. परंतु याचिकेत नायक यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आल्याने त्यांना या प्रकरणी प्रतिवादी करण्याचे आदेश न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले आहेत.
सध्या आर्थर रोड तुरुंगात बंदिस्त असलेल्या मोहम्मद वसीम अब्दुल लतीफ शेख (४७), मुस्तफा झुल्फिकार चर्निया (३७) आणि तनवीर अब्दुल अझीझ पर्यानी (४७) या तीन आरोपींनी वकील घन:श्याम उपाध्याय यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली. त्यावेळी न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले.
याचिकेनुसार, नायक हे आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी चंदनासह पकडलेल्या एका आरोपीकडे पैशांची मागणी केली होती. हा आरोपी याचिकाकर्त्यांचा मित्र होता. त्याने याचिकाकर्त्यांना नायक यांनी पैशांची मागणी केल्याबाबत सांगितले. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी नायक यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली. नायक यांना या तक्रारीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्याला अमली पदार्थांच्या प्रकरणात गोवल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.
आपल्या तक्रारीची दखल घेऊन एसीबीने नायक यांना लाच घेताना पकडण्यासाठी सापळा रचला होता. मात्र त्याच दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेदरम्यान नायक यांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आणि एसीबीने नायक यांना लाच घेताना पडकण्याची योजना रद्द केली, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.