शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर भाजप-शिवसेना युती तुटलीच नसती, असे प्रतिपादन करीत केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘आता हा विषय आमच्यासाठी संपला आहे,’ असे स्पष्ट केले. महाराष्ट्रात गेली काही वर्षे सुरू असलेल्या आघाडीच्या राजकारणाची कूस बदलली आहे. भाजप स्वबळावर किमान १६० जागांवर विजयी होईल आणि तरीही जे आम्हाला पाठिंबा देतील, त्यांना सोबत घेतले जाईल, असेही जावडेकर यांनी सांगितले.
‘लोकसत्ता-आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात बोलताना पर्यावरण विभागातील निर्णयप्रक्रियेत केलेल्या बदलांबरोबरच राज्यातील राजकीय परिस्थितीचे जावडेकर यांनी विश्लेषणही केले. आणीबाणीनंतर जनता पक्षाचे आणि नंतर पुलोद सरकार आले. गेल्या १५ वर्षांतही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार होते. आता युती-आघाडी तुटल्याने सर्व पक्ष स्वबळावर लढत आहेत. राज्यातील आघाडीचे राजकारण बदलले आहे आणि सत्तेच्या सारीपटावर फेरमांडणी झाली आहे. त्यात वाईट काहीच नाही, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. मात्र युती तोडण्याची आमची इच्छा नव्हती व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते, तर तसे झालेही नसते. महायुती असल्यामुळे आमच्याबरोबर चार घटक पक्षही होते. त्यांना जागा सोडल्यावर उर्वरित जागा १३० भाजपने आणि १४० शिवसेनेने लढवाव्यात, असेही सूत्र शिवसेनेने मान्य केले नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याची वेळ आली आणि शेवटी नाइलाजाने मुदत संपण्याआधी ४८ तास युती तोडण्याचा निर्णय भाजपने घेतला, अशी भूमिका जावडेकर यांनी मांडली. शिवसेनेविरोधात बोलणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता आम्ही युती तुटल्याचा विषय संपविला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘सबका साथ सबका विकास’ हे आमचे सूत्र असून बहुमताने सत्ता मिळविली तरी आम्हाला जे पाठिंबा देतील त्यांनाही बरोबर घेऊन वाटचाल केली जाईल, असे जावडेकर यांनी सांगितले. राज्यातील जनतेला विकास आणि सुशासन हवे असून पंतप्रधान मोदी केंद्रात जे करून दाखवीत आहेत, तेच महाराष्ट्रात भाजप सरकार करून दाखवेल, असा प्रचार आम्ही करीत आहोत. १९९० पासून झालेल्या आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाने कधीही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे भाजपनेही तीच भूमिका ठेवली, असे जावडेकर यांनी सांगितले.
आपद्धर्म अन् राजकीय वास्तव
भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमुक्त करण्याचा संकल्प केला असताना त्या पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश व उमेदवारी देऊन नेमके काय साधले व परिवर्तन कसे घडविणार, असे विचारता ‘आपद्धर्म’ आणि राजकीय वास्तवातून हे केल्याचे जावडेकर यांनी नमूद केले. निवडणूक हीजिंकण्यासाठीच लढावी लागते आणि कोणत्याही पक्षात सर्वच नेते वाईट नसतात, असे प्रमाणपत्रही जावडेकर यांनी दिले. अन्य पक्षांमधील अनेक नेते भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक होते, पण आम्ही सर्वाना घेतले नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.
ल्लसविस्तर वृत्तांत वाचा,
रविवार १२ ऑक्टोबरच्या अंकात