शिवसेना कोणत्याही परिस्थितीत हिंदूत्व सोडणार नाही. राज्यात मराठी आणि देशात हिंदुत्व यासाठीच आम्ही लढणार, असे सांगतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये विधानभवनावर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, अशी घोषणा केली.शिवसेनेचा ४७ वा वर्धापनदिन माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात बुधवारी झाला. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. परदेशातून आलेले नेते चालतात. मग परदेशातून आणलेल्या कल्पना चालत नाहीत का, असे विचारत त्यांनी रेसकोर्सवरील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उद्यान संकल्पनेचे समर्थन केले. स्वातंत्र्य मिळाल्यापासून मुंबईमध्ये आपण नवे काही निर्माण केले आहे का? एक चांगले उद्यान उभे राहत असेल तर बिघडले कुठे, असा प्रश्न करून ही जागा सरकारची का पालिकेची यापेक्षा ती मुंबईकरांची आहे हे लक्षात घ्या, असेही ते म्हणाले. रेसकोर्सवर मला लवासा उभारायचे नाही, असा टोलाही त्यांनी शरद पवार यांना लगावला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेवरून खाली खेचले तरच महाराष्ट्राचा विकास होईल, असे सांगून ते म्हणाले की, मी काल परदेशातून आलो आणि आज पवार परदेशात गेले. कल्पना सुचण्यासाठी आम्हाला परदेशात जावे लागत नाही. महाराष्ट्राच्या विकासाकरिता या काका-पुतण्यांनी काहीच केलेले नाही. सिंचनाचे कोटय़वधी रुपये त्यांनी ओरबाडले आहेत. आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राची पुरती वाताहत झाली आहे. भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. गेल्या वर्षभरात १७०० हून अधिक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. सेनेची सत्ता आल्यानंतर हे चित्र बदललेले दिसेल. निवडणुकीसाठी सर्वांनी सज्ज रहावे. कोणत्याही क्षणी निवडणुका होतील असे सांगून पावसाळ्यानंतर आपण प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मेळावे घेणार असून प्रत्येक शाखांमध्ये फिरणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
तोवर भाजपची साथ!
निधर्मीवादाच्या मुद्दय़ावर हिंदुत्वाला टाचेखाली घेत नितीश कुमार बाहेर पडले आहेत पण हिंदुत्व सोडत नाहीत तोवर आम्ही भाजपबरोबर राहू.
मनसेबाबत मौन
युतीत मनसे यावी यासाठी भाजप नेते प्रयत्न करीत असताना उद्धव यांनी मात्र या समारंभात त्याबाबत मौन बाळगले.