मुंबई : राज्यातील सत्ताधारी भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या महाविकास आघाडीच्या एकजुटीला तडा जाऊ नये, यासाठी वादग्रस्त ठरणारा सावरकर मुद्दा बाजुला ठेवण्याची भूमिका काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ांपासून राज्यात विभागवार घेण्यात येणाऱ्या महाविकास आघाडीच्या संयुक्त जाहीर सभांमधून भाजप-शिंदे गटाला प्रत्तुत्तर देण्याची रणनीती आखण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठवण्याच्या तसेच त्यानंतर गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाच्या विरोधातही काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेसची एकजूट दिसली. मात्र राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली.  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरे यांच्या विधानावर सावध प्रतिक्रिया दिली असली तर, सावरकरांबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट असून, त्यात कोणतीही तडजोड केली जात नाही, याची जाणीवही करुन दिली. परंतु देशात जे हुकुमशाहीचे संकट येत आहे, त्यामुळे लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे, त्याचा मुकाबला करणे सध्या महत्त्वाचे आहे, त्यामुळे सावरकर हा वाद बाजुला ठेवणे आवश्यक आहे, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

हेही वाचा >>> पवारांची मध्यस्थी, सावरकरांबाबत काँग्रेसचे नरमाईचे संकेत

सभेसाठी जय्यत तयारी

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभाराविरोधात विशेषत: महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रान उठविण्याची रणनीती महाविकास आघाडी सरकारने आखली आहे. त्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर येथील २ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या संयुक्त जाहीर सभेतून केली जाणार आहे. पहिलीच सभा भव्यदिव्य करण्याचे नियोजन आहे. परंतु सावरकर वादाने त्यावर परिणाम होऊ नये, यासाठी हा विषय सध्या घ्यायचा नाही, असे त्यांचे मत आहे. सध्याच्या परिस्थितीत शिवसेना ठाकरे गट , काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर समविचारी पक्षांची एकजूट महत्त्वाची असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

हेही वाचा >>> Rahul Gandhi Bungalow: निवासस्थान सोडण्याच्या आदेशाचे पालन करू!, राहुल गांधींचे लोकसभा सचिवालयाला पत्र

काही मुद्यांवर मतभिन्नता -थोरात

संगमनेर : काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तीन पक्ष किमान समान कार्यक्रम हातात घेऊन एकत्र आले. प्रत्येक पक्षाचे मत आणि विचारधारा वेगवेगळी असू शकते. त्यातूनच आमच्यात काही मुद्दय़ांवर मतभिन्नता असल्याचे मत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून सध्या ठाकरे गटाने काँग्रेसवर शरसंधान करत टीकास्र सोडले आहे. तसेच सावरकरांवर टीका न करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत थोरात संगमनेरात माध्यमांशी बोलत होते.

काँग्रेसचे युवा नेते खासदार राहुल गांधी यांचे सावरकरांबाबतचे मत हे आमच्या पक्षाचे मत आहे. ते अन्य पक्षाचे असलेच पाहिजे असे नाही. या मुद्दय़ावर मतभिन्नता असू शकते. परंतु आम्ही महाविकास आघाडी ही काही किमान समान कार्यक्रम घेऊन तयार केलेली असल्याने ठाकरे गटाला देखील या मुद्दय़ांचा विचार करावा लागेल. दरम्यान आमच्यातील या मतभिन्नतेवरून भाजपचा महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु आमच्यात फूट पडणार नाही. आम्ही किमान समान कार्यक्रमावर आधारितच काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.