काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील वाढती कटुता लक्षात घेता आघाडी कायम राहणार की त्यात बिघाडी होणार याबाबत चर्चेच्या कंडय़ा पिकत असतानाच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर राहू, पण विधानसभा निवडणुकीच्या वेळी परिस्थितीनुरूप निर्णय घेऊ, असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या नेतेमंडळींकडे दिले.
आगामी निवडणुकींच्या दृष्टीने पवार यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणून दिल्लीत महत्त्वाची भूमिका बजाविण्याची पवार यांची योजना आहे. गुजरात निवडणुकीवरून पवार यांनी सध्या काँग्रेसवर नेम धरला आहे. काँग्रेसबरोबर आघाडी आता थांबवा, अशी मागणी राष्ट्रवादीतून होऊ लागली आहे. काँग्रेसचे नेतृत्व पवार यांना पूर्वीएवढे महत्त्व देत नाही, अशी सध्या परिस्थिती आहे. लोकसभा निवडणुका कधीही होऊ शकतात. यामुळे आतापासूनच तयारीला लागा, असा स्पष्ट आदेश पवार यांनी सोमवारी पक्षाच्या नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीत दिला. लोकसभा निवडणुकीत शक्यतो काँग्रेसबरोबर आघाडी कायम राहील. या निकालावरच पुढचे भवितव्य ठरवू, असाच एकूण पवार यांचा सूर होता, असे पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची पीछेहाट झाल्यास विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर राहण्याची शक्यता फारच कमी आहे. जनतेच्या रोषाचा फटका काँग्रेसला बसू शकतो याचा अंदाज आला तरी पवार काँग्रेसची साथ सोडतील, असा काँग्रेस नेत्यांचा अंदाज आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शिवसेनेला बरोबर घेऊ शकते, असाही एक अंदाज बांधला जात आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा काँग्रेसची सत्ता आल्यास पवार राज्यातही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी कायम ठेवतील. एकूणच लोकसभा निकालांवर राज्यातील आघाडीचे भवितव्य अवलंबून असल्याचे मानले जाते.  शिवसेनेचे काही खासदार-आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असले तरी त्यांचा पक्षप्रवेश लगेचच केला जाणार नाही. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर त्याचा राजकीय लाभ उठविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.
मंत्रिपद सोडण्यास कोणीही तयार नाही
राज्यातून जास्त खासदार निवडून आणायचे असल्यास नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देऊन फायदा होत नाही. त्यामुळे काही विद्यमान मंत्र्यांना लोकसभेची निवडणूक लढवावी लागणार आहे. छगन भुजबळ, जयंत पाटील आदी काही मंत्र्यांची नावे त्यासाठी घेतली जात आहेत. मात्र कोणाचीही मुंबई सोडून नवी दिल्लीत जाण्याची मानसिकता नाही. राज्यातच कायम राहण्याची आपली इच्छा असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. जयंत पाटील किंवा अन्य कोणीही मंत्री लोकसभा निवडणूक लढविण्याच्या भानगडीत पडणार नाही, असेच एकूण चित्र आहे.