सर्व सामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू व्हावी या मागणीसाठी आता भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज मुंबईत भाजपा नेत्यांच्या नेतृत्वात यासाठी ठिकठिकाणी रेल्वेस्थानकांवर आंदोलनास सुरूवात झाली आहे. चर्चगेट स्टेशन बाहेर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात तर कांदिवलीमध्ये भाजपा आमदार अतुल भातखळकरांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू झालं आहे.

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सामान्य नागरिकांना प्रवास करण्याची मुभा मिळावी आणि लोकल प्रवासाला परवानगी न देण्याच्या विरोधात मुंबई भाजपाच्या वतीने  आंदोलन करण्यात येत आहे.

याप्रसंगी भाजपा नेते व कार्यकर्त्यांकडून महाविकासआघाडी सरकारविरोधात घोषबाजी करण्यात येत आहे. तर, या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी मोठ्याप्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याचे दिसत आहे. शिवाय, भाजपाच्या काही कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतलं गेलं आहे. चर्चगेट, दहिसर घाटकोपर या ठिकाणी आंदोलनास सुरूवात झाली आहे.

तर, ”लसीचे दोन डोस झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाला परवानगी द्यावी!, ही आमची जुनी मागणी आहे. आता न्यायालयाने याबाबत सरकारला सांगितलं आहे. आम्ही विचारतो, ते राजकारण वाटत असेल, परंतु न्यायालयाने विचारणा केल्यावर तरी राज्य सरकारला जाग येणार आहे का?” असा सवाल दरेकरांनी राज्य सरकारला केला आहे.

मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते महाराष्ट्र सरकार विरोधात शुक्रवारी सकाळी १० ते ११ या दरम्यान मुंबईच्या सर्व स्थानिक रेल्वे स्थानकांवर आंदोलन करतील, असे काल कळवण्यात आले होते.

रेल्वेप्रवासाला मज्जाव का?

तर, ‘बेस्ट’ बससह अन्य सार्वजनिक वाहनांतील गर्दी चालू शकते; मग उपनगरी रेल्वेप्रवासाला मज्जाव का? अशी विचारणा करत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्याच्या निर्बंधांतील विसंगतीवर बोट ठेवले. ‘‘मुंबईच्या गरजा व प्रश्न इतर शहरांपेक्षा वेगळे आहेत. रेल्वेप्रवास ही मुंबईकरांची मुख्य गरज आहे’’, असे नमूद करत न्यायालयाने लसीकरण झालेल्यांना प्रवासमुभा देण्याबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी सूचना राज्य सरकारला केली.

Story img Loader