सुशांत मोरे

करोनामुळे बुडालेले उत्पन्न, आर्थिक चणचणीमुळे कर्मचाऱ्यांचे रखडणारे वेतन आदी कारणांमुळे कर्मचाऱ्यांना सेवेत असतानाही अन्यत्र नोकरी करण्याची मुभा देण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाकडून तयार करण्यात आला आहे. संचालक मंडळाच्या आगामी बैठकीत तो मंजुरीसाठी येईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली

सेवेत असताना एसटी कर्मचाऱ्यांना अन्य खासगी कंपनीत वा उद्योगधंद्याच्या ठिकाणी कमीत कमी सहा महिने किंवा जास्तीत जास्त पाच वर्षे नोकरी करता येईल. त्यासाठी एसटी महामंडळाकडून विना वेतन असाधारण रजा मंजुर केली जाईल. ती नोकरी आवडल्यास कर्मचारी एसटीतील नोकरीचा राजीनामा देऊ शकतो. राजीनाम्यानंतर त्याला एसटी महामंडळाकडून भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युएटी इत्यादी भत्तेही मिळतील. एसटीत एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ सेवेत असलेला कर्मचारी या योजनेसाठी पात्र ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

या योजनेमुळे त्या कर्मचाऱ्याची एसटीतील नोकरी मात्र किमान पाच वर्षे टिकून राहिल. खासगी कंपनीतील नोकरी न पटल्यास एसटीत पुन्हा रुजू होता येईल. एसटीत आधी जेवढी वर्ष झाली होती, तोच कालावधी ग्राह्य़ धरुन कर्मचाऱ्याला पुन्हा सेवेला सुरुवात करता येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

एसटीकडून खर्च कपातीचे धोरण अवलंबवण्यात आले असून त्याचाच भाग म्हणून ही योजना आणली जाणार आहे. वेतनावरील भार कमी करण्यासाठी याआधी स्वेच्छानिवृत्ती योजनेला महामंडळाकडून मंजुरी देण्यात आली. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.