राज्यातील सर्व मंत्र्यांनी आपली संपत्ती जाहीर करावी, या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशाला मंत्रिमंडळातील जवळपास निम्म्या मंत्र्यांनी केराची टोपली दाखविल्याचे माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीमुळे स्पष्ट झाले. चव्हाण यांनी पहिल्यांदा २०१० मध्ये आणि नंतर २०११ मध्ये मंत्र्यांना संपत्ती जाहीर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, केवळ ५५ टक्के म्हणजेच मंत्रिमंडळातील निम्म्या मंत्र्यांनीच आपली संपत्ती आतापर्यंत जाहीर केली.
राज्यात दुष्काळ असताना नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी आपला मुलगा आणि मुलीच्या लग्नात वारेमाप खर्च केल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका करण्यात आली. तसेच त्यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून, हा प्रश्नदेखील उपस्थित करण्यात आला. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱयांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी केली. त्याचवेळी जाधव यांनी अद्याप आपली संपत्ती जाहीर केलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. माहिती अधिकाराचे कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारात यासंदर्भात ही माहिती मागविली होती.
आतापर्यंत एकूण ४० मंत्र्यांपैकी केवळ २२ जणांनीच आपली संपत्ती जाहीर केली आहे. जाधव यांच्याबरोबरच उद्योगमंत्री नारायण राणे, गृहमंत्री आर. आर. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, सहकार आणि विधिमंडळ कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही अद्याप आपली संपत्ती जाहीर केलेली नाही.
चव्हाण यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, वनमंत्री पतंगराव कदम, जलसंपदामंत्री रामराजे नाईक-निंबाळकर, शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा