अनिश पाटील
कमी व्याज दरात कर्ज देण्याच्या नावाखाली सध्या खंडणी उकळण्याचे प्रकार वाढत आहेत. मोबाइलॲप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगून त्याच्या माध्यमातून मोबाइलमधील खासगी माहिती मिळवून आरोपी असे प्रकार करीत आहेत. कर्ज वसुलीच्या नावाखाली करण्यात आलेल्या जाचाला कंटाळून मालाडमध्ये ३८ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून अशा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कर्ज घेणे टाळायला हवे.
दुसरीकडे पोलिसांनीही अशा गुन्ह्यांचा तपास करताना अधिक संवेदनशीलता दाखवण्याची आवश्यकता आहे. सध्या विविध ऑनलाइनॲपद्वारे नागरिकांना कमी कालावधीचे ऑनलाइन कर्ज घेण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांची गोपनीय माहिती मिळवून धमकावून खंडणी उकळण्याचे प्रकार घडत आहेत. आरोपी वेगवेगळय़ा आकर्षक कर्जाचे प्रस्ताव देतात. कमी व्याजदर ठेवून कमी वेळेत कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना ऑनलाइन कर्ज दिले जाते. नागरिकांना कर्ज घेण्याकरिता कंपनीचा ॲप मोबाइलमध्ये डाउनलोड करण्यास सांगून त्यांच्या मोबाइलमधील छायाचित्रे, संपर्क क्रमांक, चित्रफिती आदी महत्त्वपूर्ण माहिती संबंधित कंपनीस शेअर करण्याची अट ठेवूनच नागरिकांना कर्ज मंजूर करण्यात येते. त्यानंतर संबंधित व्यक्तीने कंपनींचे कर्ज फेडल्यानंतरही त्यांना अधिकची रक्कम भरण्याची सक्ती करण्यात येते व ग्राहकाने त्यास विरोध केल्यास ते कर्ज मंजूर करताना ग्राहकाने सादर केलेल्या त्याच्या मोबाइलमधील माहितीद्वारे संबंधित व्यक्तीला व त्याचे नातेवाईक-मित्र मंडळींना शिवीगाळ करणे, अश्लील छायाचित्र अथवा चित्रफीत पाठवून अधिक पैसे भरण्याची धमकी दिली जात आहे. त्याबदल्यात खंडणी मागितली जाते.
मुंबईत अशी प्रकरणे वाढत आहेत. गेल्या तीन महिन्यांत एकटय़ा मुंबईत अशा प्रकारचे २१ हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. तर राज्यात १५० हून अधिक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. तक्रारदारांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय अनेकजण बदनामीच्या भीतीने तक्रार करीत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अशाच प्रकारे कर्ज वसुली करणाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून मालाडमधील ३८ वर्षांच्या एका व्यक्तीने आत्महत्या केली. या व्यक्तीचे मॉर्फ केलेले छायाचित्र आरोपींनी त्यांच्या मित्र-मैत्रीण व सहकर्मचाऱ्यांना पाठवले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कर्ज वसुलीसाठी या व्यक्तीच्या मागे तगादा लावला होता. या व्यक्तीने त्याची माहिती भावाला दिली होती. भावाने त्याला धीरही दिला होता. पण आरोपींनी त्याचे आक्षेपार्ह छायाचित्र अनेकांना पाठवल्यामुळे त्याला नैराश्य आले. घरात कुणीही नसताना त्याने आत्महत्या केली.
अंधेरी पूर्व येथे राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेच्या बाबतीतही असाच प्रकार घडला होता. आरोपींनी महिलेच्या दीराला तिचे छायाचित्र व अश्लील संदेश पाठवले. तक्रारदार महिलेला ५० हजार रुपये कर्ज देण्यासाठी आरोपीने त्यांना एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले होते. २१ एप्रिलला त्यांनी हे ॲप्लेकेशन डाऊनलोड केल्यानंतर आरोपीने केवळ तीन हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यानंतर कर्जाच्या रकमेच्या नावाखाली केवळ १७०० रुपये या महिलेला पाठवले. त्यांना ५० हजार रुपयांची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी तात्काळ कर्जाची रक्कम परत केली. त्यावेळी आरोपीने तीन हजार रुपयांची खंडणी मागून ती न दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने मंगळवारी तक्रारदार महिलेच्या दीराला त्यांचे छायाचित्र पाठवून कर्जाची रक्कम परत करण्यासाठी ती महिला वेश्याव्यवसाय करीत असल्याचा संदेश पाठवला. हा प्रकार महिलेला कळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार केली.
अंधेरी रेल्वे पोलिसांनी नुकतीच एका तरुणाला कर्नाटकमधून अटक केली. त्यानेही एका अशा पद्धतीने महिलेला धमकावले होते. कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी संबंधितांना धमकावण्याचे काम हा आरोपी करीत होता. त्यासाठी त्याला १० टक्के कमिशन मिळत होते. ही बाब आरोपीची चौकशी केल्यानंतर उघडकीस आली. पण असे गुन्हे सतर्क राहिल्यास टाळता येतील. मोबाइलमधील छायाचित्रे, संपर्क क्रमांक, चित्रफिती अशी महत्त्वपूर्ण माहिती संबंधित कंपनीस उपलब्ध करण्याचे बंधन ठेवूनच नागरिकांना कर्ज मंजूर करण्यात येते. त्यामुळे कोणतेही अनोळखी अॅमप्लिकेशन डाऊनलोड करताना अशी बंधने स्वीकारू नयेत.
कोणत्याही अनधिकृत ॲपव्दारे कर्ज घेऊ नका व कमी कालावधीच्या ऑनलाइन कर्जाच्या आमिषाला बळी पडू नका. तसेच कोणासोबत असा प्रकार घडल्यास त्याबाबत जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार करण्यात येत आहे. मुळातच अनोळखी ॲप्लिकेशन मोबइलमध्ये डाऊनलोड केले नाही तर आपोआपच अशा प्रकारांना आळा बसू शकेल.
पोलिसांनीही अशी प्रकरणे अधिक संवेदनशीलतेने हाताळण्याची आवश्यकता आहे. अनेक सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणुकीची रक्कम कमी असल्यामुळे त्यांच्या तपासाला तेवढे महत्त्व दिले जात नाही. परिणामी, गुन्हेगार व्यक्ती सोकावते आणि अन्य नागरिकांची फसवणूक करीत राहते.
ॲप्लिकेशनद्वारे कर्ज देऊन खंडणीच्या प्रकरणांमध्ये तक्रारदारांची आरोपींकडून बदनामी केली जाते. अशा प्रकारच्या त्रासाला कंटाळून मालाडमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी अधिक संवेदनशीलता दाखवणे आवश्यक आहे. तसेच नातेवाईक, मित्र परिवारानेही अशा गुन्ह्यांला बळी पडलेल्या व्यक्तीला मानसिक आधार देणेही तितकेच आवश्यक आहे.
शहरबात :संवेदनशीलतेबरोबर सतर्कताही गरजेची
कमी व्याज दरात कर्ज देण्याच्या नावाखाली सध्या खंडणी उकळण्याचे प्रकार वाढत आहेत.
Written by अनिश पाटील

First published on: 24-05-2022 at 01:14 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Along sensitivity vigilance needed loans at low interest rates police crimes medium amy