कोकण आणि हापूस आंबा यांचे अतूट समीकरण ‘आंबा महोत्सवा’च्या निमित्ताने कोकण आणि मुंबईकरांना माहिती होते. कोकणच्या या ‘राजा’ला जागतिक प्रसिद्धी मिळावी व युरोपच्या बाजारात हापूस आंब्याची बाजारपेठ विकसित व्हावी, या उद्देशाने ग्लोबल कोकण आणि कोकण भूमी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच लंडन येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात अवघ्या सहा तासांत २ हजार डझन हापूस आंब्यांची विक्री झाली.  
लंडन येथील महापौरांच्या वतीने दरवर्षी ट्रफलगार चौकात बैसाखी महोत्सव आयोजित करण्यात येतो. यंदाच्या या उत्सवात खास आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ४ आणि ५ मे रोजी लंडन येथे आणि ६ मे रोजी लिस्टर येथे हा आंबा महोत्सव झाला.
लंडनच्या उपमहापौर व्हिक्टोरिया बोरविक यांनी या महोत्सवाला भेट दिली आणि कोकणातील आंब्याला लंडनमध्ये बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. युरोपियन बाजारपेठेत ‘ग्लोबल कोकण अल्फान्सो’ हा ब्रॅण्ड विकसित करण्याचे कोकण भूमी प्रतिष्ठानने ठरविले आहे.
या महोत्सवाच्या निमित्ताने लंडनमधील प्रसिद्ध कॅटर्स ‘मधूज’च्या माध्यमातून २० हजार लोकांना मँगो लस्सीचेही या वेळी वाटप करण्यात आले. या महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, कृषी पणन विभाग आणि राजा-राणी ट्रॅव्हल्सचे अभिजीत पाटील यांचेही विशेष सहकार्य मिळाले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, आमदार भाई जगताप, कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, ‘खाना खजाना’ कार्यक्रमातील प्रसिद्ध शेफ संजीव कपूर, कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, माजी आमदार बाळ माने आणि १५ आंबा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.

Story img Loader