नेहरू विज्ञान केंद्र

ऐतिहासिक वैज्ञानिक वस्तूंचे संर्वधन, समाजामध्ये वैज्ञानिक जिज्ञासेची जागृती आणि सर्वसामान्यांना समजेल अशा स्वरूपात विज्ञानाची मांडणी या उद्देशातून स्थापन झालेले नेहरू विज्ञान केंद्र हे भारतातील पहिलेच विज्ञान केंद्र. दैनंदिन जीवनापासून ते संशोधनापर्यंत पसरलेले अगाध विज्ञान विश्व सर्वसामान्यांसाठी खुले करणारे नेहरू विज्ञान केंद्र दोन दशकांहूनही अधिक काळ विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी कार्यरत आहे.

युरोपमधील विज्ञान संग्रहालयाच्या धर्तीवर भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेने कलकत्ता आणि बंगळूरु येथे विज्ञान संग्रहालये स्थापित केली. संग्रहालयांमधून कशालाही हात न लावता केवळ वस्तू पाहता येते. मात्र विज्ञानाचा पायाच मुळी प्रयोग आहे. तेव्हा प्रयोग न करताच विज्ञान समजून घेणे अवघड आहे. प्रेक्षकांना सहभागी करून प्रयोगशील प्रकल्पांच्या विज्ञानांची मांडणी करणे गरजेचे आहे, या उद्देशातून राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेने मुंबईतील वरळी येथे ११ नोव्हेंबर १९८५ रोजी नेहरू विज्ञान केंद्राची उभारणी केली. या केंद्राचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते करण्यात आले.

नेहरू विज्ञान केंद्राची उभारणी १९८५ साली झाली असली तरी वरळी येथील कचराभूमीचा कायापालट करून येथे १९७७ पासूनच विज्ञान केंद्राचा पाया रचला जात होता. यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे विज्ञान उद्यान. विज्ञान चार भिंतींत नव्हे तर खुल्या वातावरणात समजून घेता यावे, या उद्देशातून राष्ट्रीय विज्ञान संग्रहालयाने १९७९ मध्ये मुलांसाठी विज्ञान उद्यान साकारले. ध्वनी, बल, शारीरिक अवयव आदी वैज्ञानिक संकल्पना खेळाच्या माध्यमातून उलगडणाऱ्या या विज्ञान उद्यानाला तीन दशकांहूनही अधिक काळ उलटला आहे, तरी मुलेच काय मोठय़ा व्यक्तीही विज्ञानाच्या गमतीजमती पाहण्यासाठी उत्साहाने येत असतात. विज्ञान केंद्रातील हे उद्यान जगातील पहिले विज्ञान उद्यान असून या संकल्पनेच्या धर्तीवर अमेरिका, युरोप आणि आफ्रिका येथेही अशा विज्ञान उद्यानांची उभारणी करण्यात आली आहे.

नेहरू विज्ञान केंद्रामध्ये विविध संकल्पनांवर आधारित अशा १२ खोल्या उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये मुख्यत्वेकरून प्रकाश, ध्वनी, वास, स्पर्श, चव अशा ज्ञानेंद्रियांशी निगडित विज्ञान समजून घेणारे विविध प्रयोग मांडण्यात आले आहेत. ध्वनी म्हणजे काय, ध्वनींचे विविध प्रकार, ध्वनी कसा मोजणार इथपासून ते कान या अवयवाची विस्तृत मांडणी करणारे विविध खेळ, गमतीजमती, प्रयोग या खोलीमध्ये मांडण्यात आले आहेत. प्रकाश का दिसतो, प्रकाश नसेल तर काय होईल असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात, परंतु याची नेमकी उत्तरे साध्या सोप्या पद्धतीने विज्ञान केंद्राच्या प्रकाश खोलीमधून मिळतात. मानव आणि यंत्र यांचा संबंध उलगडणाऱ्या विविध रचना थक्क करणाऱ्या आहेत. भारतातील प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडवताना स्थापत्यशास्त्र, शिल्प, वस्त्रनिर्मिती, धातू आणि गणिताची निर्मिती अशा विविध विषयांवरही प्रकाश टाकणारी गॅलरीही इथे पाहायला मिळते. विश्व उत्पत्तीपासून ते जीवसृष्टीतील प्राणिजीवन, जल, वायू परिवर्तन आदी बाबीही केंद्रामध्ये उलगडण्यात आल्या आहेत. ऊर्जा आणि ऊर्जेची विविध रूपे, बल, गती या वैज्ञानिक संकल्पना पाठय़पुस्तकामध्ये असल्या तरी प्रत्यक्ष दैनंदिन जीवनाशी असलेले संबंध मांडणारे वैज्ञानिक प्रयोग मुलांसोबतच मोठय़ा व्यक्तींनाही विज्ञानाबाबत उत्सुकता निर्माण करणारे आहेत. आरशाच्या माध्यमातून केलेल्या गमतीजमतीतून विज्ञान किचकट वाटत असले तरी ते समजून घेतले की मजेशीर आहे याचीच प्रचीती येते.

विज्ञान केंद्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक प्रयोग, थ्रीडी विज्ञान शो, तारांगण, आकाश दर्शन आदी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. सायन्स ऑन द स्फिअर या जवळपास ३० मिनिटांच्या कार्यक्रमामध्ये मोठय़ा गोलाकार पटलावर सध्या पृथ्वी कशी दिसते, पाऊस कुठे पडत आहे इथपासून ते अगदी सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह कसे दिसतात हे पाहता येते. नासाच्या माध्यमातून ही सर्व माहिती या गोल पटलावर प्रोजेक्टरच्या मदतीने दाखविली जाते. याव्यतिरिक्त विज्ञान केंद्राच्या माध्यमातून विज्ञान प्रश्नमंजूषा, विज्ञान उत्सव, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन, विज्ञान नाटय़ स्पर्धा आदी कार्यक्रमही राबवले जातात.

शाळेमध्ये विज्ञान शिकण्याला मर्यादा येतात. तेव्हा विज्ञानाची आस असलेल्या प्रत्येकाला विज्ञान समजून घेण्याची संधी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. मुंबईमध्ये असलेल्या या एकमेव विज्ञान केंद्राला दरवर्षी जवळपास सात लाख प्रेक्षक भेट देत असून यामध्ये सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांचा समावेश असतो.

नेहरू विज्ञान केंद्रामध्ये विविध वैज्ञानिक उपकरणे साकारण्यासाठी केंद्राने वर्कशॉपदेखील उभारले असून येथील तंत्रज्ञांच्या मदतीने वैज्ञानिक उपकरणांची निर्मिती केली जाते. विज्ञान केंद्रामध्ये सध्या ५०० हून अधिक वैज्ञानिक उपकरणे उपलब्ध असून यामध्ये नावीन्य आणण्यासाठी केंद्राकडून सातत्याने नवनवीन प्रयोग केले जातात.

शैलजा तिवले – shailaja486@gmail.com

Story img Loader