आमदारांना करण्यात आलेल्या निधी वाटपावरून विधानपरिषदमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे चांगलेच आक्रमक झाले. “विधानपरिषद आणि विधानसभेतील आमदारांना असमान निधीचं वाटप झालं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील कामांची स्थगिती उठवली नाही. नवीन निधी मिळणे फार लांब राहिलं,” असा हल्लाबोल अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आमदारांना दिला जाणारा निधा हा जनतेच्या करातून दिला जातो. हा निधी काय सरकारची मालकी नाही. ज्या आमदारांना निधी दिला नाही, तेथील जनता करत भरत नाही का? त्यांना विकासाचा अधिकार नाही का?” असा सवाल अंबादास दानवे यांनी सरकारला विचारला आहे.

“भाजपाच्या आमदारांना २० कोटी, तर…”

“असमान निधीचं वाटप निषेधार्य आहे. तेथील जनतेवर आणि आमदारांवर अन्याय आहे. एखाद्याला ५० कोटी, तर दुसऱ्याला ६० कोटी रुपयांचा निधी दिला जातो. पण, एखाद्याला २ कोटी रुपयांचा सुद्धा निधी मिळत नाही. त्यामुळे सरकारने आमदारांना समान निधी दिला पाहिजे. मात्र, द्यायचेच नाही ही भूमिका मागील काळात घेतली गेली. भाजपाच्या आमदारांना २० कोटी, शिंदे गटाच्या आमदारांना ४० कोटी आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना ५० कोटी रुपयांचा निधी दिला गेला,” असं अंबादास दानवे यांनी सांगितलं.

“सर्वांना समान निधीचे वाटप करण्यात यावे”

यावेळी ‘५० कोटींचा आकडा कुठेही नाही,’ असा आक्षेप राष्ट्रवादीच्या बंडखोर गटातील आमदारांनी घेतला. त्यावर अंबादास दानवे म्हणाले, “मी दाव्यासहीत सांगेन की, ५० कोटी रुपयांचे फोन आले आहेत. मला कोणी कोणत्या नंबरवरून फोन केला, हे सांगायला भाग पाडू नका. मी सांगू शकतो. सर्वांना समान वाटप करण्यात यावे. कोणालाही देऊ नये, अशी माझी मुळीच इच्छा नाही.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambadas danve attack shinde fadnavis and ajit pawar over mla funds ssa