विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी (११ नोव्हेंबर) शिवसेना खासदार संजय राऊतांची त्यांच्या मुंबईतील घरी जाऊन भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी पत्रकारांनी तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं अशी मागणी शिवसैनिकांकडून होत असल्याचं लक्षात आणून दिलं. तसेच तेजस ठाकरे राजकारणात येणार का? असा प्रश्न विचारला. यावर अंबादास दानवेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.
अंबादास दानवे म्हणाले, “तेज ठाकरे राजकारणात येणार की नाही याबाबत मला काही माहिती नाही. कारण, शिवसैनिकांकडून अशाप्रकारची मागणी होत असते. परंतु, राजकारणात येणार की नाही यावर स्वतः तेजस ठाकरेच निर्णय घेतील. मी त्यावर बोलण्याची आवश्यकता नाही.”
भाजपा नेत्यांच्या टीकेवर दानवेंची प्रतिक्रिया
संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सत्ताधारी भाजपाकडून जोरदार टीकाही होत आहे. किरीट सोमय्यांनी हिशोब द्यावा लागेल म्हटलंय, तर मोहित कुंबोज यांनी पुन्हा घराबाहेर पडावं लागेल, असं म्हणत राऊतांना टोला लगावला. त्यावर अंबादास दानवे म्हणाले, “महाराष्ट्रात आणि देशात संजय राऊतांची प्रतिमा लढाऊ नेते अशी आहे.”
“न्यायालयाच्या तडाख्याने राऊतांवरील कारवाईला योग्य उत्तर”
“महाराष्ट्रात केंद्र सरकार आणि राज्य सरकार गद्दारी करून, ईडी-सीबीआयचा वापर करत आहे. यातूनच त्यांनी संजय राऊत यांना अटक केली. गुन्हा तर लांबच राहिला, पण न्यायालयाने ही अटकच बेकायदेशीर असल्याचं सुस्पष्टपणे म्हटलं आहे. न्यायालयाच्या या तडाख्याने या कारवाईला योग्य उत्तर मिळालं,” असंही अंबादास दानवेंनी नमूद केलं.
“राऊत महाराष्ट्रात पुन्हा ताकदीने नवा लढा उभारतील”
अंबादास दानवे म्हणाले, “मी संजय राऊत यांच्या भेटीसाठी आलो होतो, भेट झाली. मागच्या तीन-चार महिन्यापासून प्रत्यक्ष भेट नव्हती. या भेटीत त्यांचे वेगवेगळे अनुभव, किस्से यावर गप्पा मारल्या. येणाऱ्या काळात संजय राऊत शिवसेना नेते म्हणून महाराष्ट्रात पुन्हा ताकदीने नवा लढा उभारतील.”
हेही वाचा : “कोणालाही सोडणार नाही”, फडणवीसांच्या ट्वीटवर संजय राऊतांना प्रश्न, उद्धव ठाकरे म्हणाले, “याचा अर्थ…”
“त्या गोष्टी माध्यमांना सांगायच्या नसतात”
“संजय राऊत यांच्याशी आगामी मुंबई विधानसभा निवडणुका आणि इतरही चर्चा झाल्या. मात्र, त्या गोष्टी माध्यमांना सांगायच्या नसतात. चर्चा झाली हे नक्की,” असं अंबादास दानवेंनी म्हटलं.