मराठा आरक्षणाच्या मागणीवर विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. जालन्यातील मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा उल्लेख करत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गावागावातील मराठा तरुण आता पेटले आहेत, असं म्हटलं. तसेच मराठा आरक्षणासाठी संसदेच्या विशेष अधिवेशनात कायदा करावा, अशी मागणी केली. आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उबाठा) गटाच्या आमदार व खासदारांच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यानंतर अंबादास दानवे बुधवारी (६ सप्टेंबर) माध्यमांशी बोलत होते.
अंबादास दानवे म्हणाले, “राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस माफी मागतात आणि गोवारी हत्याकांडाचा दाखला देतात. ज्यावेळी गोवारी हत्याकांड झालं होतं, तेव्हा राज्याचे आदिवासी मंत्री मधुकर पिचड होते. तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता. म्हणून आम्ही मागणी करतो की, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्जबाबत केवळ माफी मागून चालणार नाही, तर राजीनामा दिला पाहिजे.”
“सारथीसाठी २२०० कोटींची घोषणा, प्रत्यक्षात केवळ ३४ कोटी दिले”
“राज्याचे मुख्यमंत्री सारथीसाठी २२०० कोटी रुपये दिले अशा वेगवेगळ्या घोषणा करतात. मी सर्व माहिती घेतली, तर आतापर्यंत सारथीसाठी, मराठा तरुणांसाठी केवळ ३४ कोटी रुपये दिले आहेत. केवळ मोठ्या घोषणा दिल्या जातात. हे लोक मोठ्या राणाभीमदेव थाटात सांगत होते की, आमचं सरकार येऊ द्या, ४ दिवसात आरक्षण देऊ,” असं म्हणत अंबादास दानवेंनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं.
“आज गावागावातील मराठा तरूण पेटलेले आहेत”
अंबादास दानवे पुढे म्हणाले, “आज गावागावातील मराठा तरूण पेटलेले आहेत. आता त्यांना सर्व समाजातून पाठिंबा मिळत आहे. म्हणूनच हे आंदोलन थांबवायचं असेल, तर सरकारने वटहुकुम काढावा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं. संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होत आहे. दिल्लीत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रश्न आला, तर केंद्रातील मोदी सरकारने २ महिन्यात कायदा केला.”
हेही वाचा : मराठा आंदोलनाला राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याकडून खतपाणी घातलं जातंय का? बाळासाहेब थोरात म्हणाले…
“मराठा आरक्षणासाठी संसदेच्या विशेष अधिवेशनात कायदा मंजूर करा”
“दिल्लीच्या प्रशासकीय कामासाठी असा कायदा होत असेल, तर मराठा आरक्षणासाठी संसदेच्या विशेष अधिवेशनात एक कायदा मंजूर केला पाहिजे, अशी मागणी शिवसेना करत आहे,” असंही दानवेंनी नमूद केलं.