अंबानी कुटुंबात काही दिवसांपूर्वीच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश आणि त्याची पत्नी श्लोका यांनी ही गोड बातमी दिली. या नवजात बाळाचा नामकरण सोहळा पार पडला असून कुटुंबातील या नव्या पाहुण्याचं नाव अंबानींनी जाहीर केलं आहे. आकाश आणि श्लोकाने त्यांच्या मुलाचं नाव पृथ्वी असं ठेवलं आहे. १० डिसेंबर रोजी पृथ्वीचा जन्म झाला.
अंबानी कुटुंबात आकाश हे नाव आधीच असल्याने या चिमुकल्याचं नाव पृथ्वी ठेवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. पृथ्वी आकाश अंबानी असं या नव्या पाहुण्याचं पूर्ण नाव आहे.
आणखी वाचा : मुकेश अंबानींनी मुलाला विचारला एक प्रश्न; तिथूनच सुरु झाली रिलायन्स जिओची कहाणी
“आकाश आणि श्लोका अंबानी यांना मुंबईत पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. मुकेश आणि नीता अंबानी प्रथमच आजी-आजोबा झाल्यामुळे अतिशय खुश आहेत. धीरूभाई आणि कोकिलाबेन अंबानी यांच्या पणतूचं ते आनंदाने स्वागत करत आहेत. बाळ-बाळंतीण सुखरूप आहेत. नव्या पाहुण्याच्या आगमनाने अंबानी आणि मेहता कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे,” अशी माहिती अंबानी कुटुंबाच्या प्रवक्त्याने दिली होती. आकाश अंबानी आणि श्लोका २०१९ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. आकाश आणि श्लोका दोघेही शाळेपासूनच एकमेकांना ओळखत आहेत. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्येच दोघांनीही आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. आकाश आणि श्लोका यांच्या लग्न अत्यंत थाटामाटात पार पडलं होतं.