शाळेच्या दाखल्यावरून जात हद्दपार करा आणि अनुसूचित जाती व जमातींचे राजकीय आरक्षण रद्द करा, या भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नव्या भूमिकेवरून राजकीय व सामाजिक क्षेत्रात वादळ उठले आहे. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन दलित-आदिवासीविरोधी भूमिका घेणाऱ्या आंबेडकर यांचा निषेध केला.
मुळात जातीपातीच्या भिंती तोडून बाहेर येणाऱ्या तरूण पिढीला सामावून घेणारी समाजव्यवस्थाच आज अस्तित्वात नाही. त्यामुळे शाळेच्या दाखल्यावरूनच जात हद्दपार करा, फक्त धर्म व राष्ट्रीयत्वाचा उल्लेख ठेवा, अशी मागणी करून आंबेडकर यांनी खळबळ उडवून दिली आहे. खास करून आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांच्या मुलांसाठी शाळेच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख असण्याची आवश्यकता नाही, अशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या अस्तित्वात असलेले लोकसभा व विघानसभेतील अनुसूचित जाती व जमातीचे राजकीय आरक्षण रद्द करावे, अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या या नव्या भूमिकेवर राजकीय क्षेत्रातून विशेषत: आंबेडकरी चळवळीतून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
प्रकाश आंबेडकर यांच्या या भूमिकेचा आठवले यांनी कडाडून विरोध केला आहे. शाळेच्या दाखल्यावरून जातीचा उल्लेख काढला तर, जातीच्या आधारावर दलित, आदिवासी व इतर मागासवर्गीयांना आरक्षणाचा लाभ कसा मिळणार, असा त्यांचा सवाल आहे. त्यामुळे आंबेडकर यांची ही मागणी केवळ दलित-आदिवासी विरोधी नाही, तर हस्यास्पद आणि डॉ. बाबासाहेबांच्या विचारांना छेद देणारी आहे, असे आठवले यांचे म्हणणे आहे. लोकसभा व विधानसभेतील राजकीय आरक्षणाला मुदत असली तरी हे आरक्षणही कायम राहिले पाहिजे, असे आठवले यांचे म्हणणे आहे. प्रकाश आंबेडकर दलित-आदिवासीविरोधी आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

Story img Loader