डॉ. शरद काळे यांचे मत
आंबेडकरांनी अर्थशास्त्रावरील अनेक पैलूंचा सखोल अभ्यास केला. त्यांचे अर्थशास्त्रावरील योगदान मोठे असून त्याचा अभ्यास होण्याची सध्या आवश्यकता असल्याचे मत ‘एशियाटिक सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. शरद काळे यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीनिमित्त ‘एशियाटिक सोसायटी’तर्फे आयोजित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे अर्थकारण’ या विषयावर बोलताना त्यांनी वरील मत मांडले.
आंबेडकरांसारख्यांनी एखाद्या विषयावर विचार जरी मांडले तरी ते विचार मोठय़ा समूहावर प्रभाव पाडतात. त्यांनी अर्थशास्त्रावरील आपल्या भूमिका मांडताना योग्य वेळ साधली होती. यासाठी त्यांनी संत तुकारामांच्या ओव्यांचे उदाहरण दिले. तसेच एशियाटिक सोसायटीच्या टाऊन हॉलमध्येच सयाजीराव गायकवाडांनी मी एका अस्पृश्याला परदेशी शिक्षणासाठी नक्की शिष्यवृत्ती देईन, अशी घोषणा केली होती. तीच शिष्यवृत्ती डॉ. आंबेडकरांना मिळाल्याची आठवण काळे यांनी सांगितली. अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास केलेल्या आंबेडकरांनी रुपयाचे अवमूल्यन व्हावे व कृषी उद्योगाचे औद्योगिकीकरण व्हावे अशा धाडसी मागण्या ब्रिटिशांच्या काळात योग्य वेळ साधत मांडल्या होत्या. पण त्या सगळ्यांचाच आजवर अभ्यास केला गेला नाही, त्यामुळे ‘अर्थशास्त्री’ म्हणून आंबेडकरांचा अभ्यास करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केली.
राजकारणामागे अर्थशास्त्रीय दृष्टिकोन असतो. लोकमान्य टिळकांनी अर्थशास्त्राचे शिक्षण न घेताही अर्थशास्त्राच्या विविध बाजूंचा अभ्यास केला, तर आंबेडकरांनी अर्थशास्त्राचा रीतसर अभ्यास केला होता, असे गिरीश कुबेर म्हणाले. त्या काळात ब्रिटिशांकडून अर्थशास्त्रावरील भारतीय अभ्यासकांच्या कामाचे कौतुक केले जात नव्हते. १९३०च्या दशकात ब्रिटिश सरकारमधील प्रतिनिधी सर जेम्स ग्रिग यांनी तर ऑस्ट्रेलियन अर्थवेत्ते एच. डब्ल्यू. अर्न यांनी भारतीय अर्थशास्त्री अभ्यासकांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला होता. आंबेडकर हे पहिले राजकारणी होते, ज्यांचे अर्थशास्त्रावरील प्रबंध नामांकित शैक्षणिक नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले. अभ्यासात ते २०-२२ तास घालवत असत. त्यांनी अर्थशास्त्रावरील तब्बल २९ अभ्यासक्रम, इतिहासावरील ११, समाजशास्त्रावरील ६, तत्त्वज्ञानावरील ५, राजकारणावरील ३ आणि मानववंश शास्त्रावरील ४ इतक्या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेतले होते. त्यांनी नंतर मुंबई विद्यापीठात येऊन प्राध्यापकी केली. डॉक्टरेट करण्यासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये गेले. पैसा व अपुरी जमीन ही शेतकऱ्यांच्या अधोगतीला कारणीभूत असून कृषी क्षेत्राचे औद्योगिकीकरण करणे हाच यावरील उपाय आहे. हे दोनही धाडसी विचार त्यांनी ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असताना मांडल्याचे कुबेर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा