दादर येथील इंदू मिलच्या जमिनीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी प्राथमिक नियोजनाची जबाबदारी मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) सोपविण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. या स्मारकासाठी केंद्रीय किनारा नियमन व्यवस्थापनानेही (सीएरझेड मॅनेजमेंट) मान्यता दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
विधान परिषदेत सुभाष चव्हाण, संजय दत्त, अशिष शेलार, भाई जगताप, विनायक मेटे, भाई गिरकर, आदी सदस्यांनी इंदू मिलच्या जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या आंबेडकर स्मारकाबाबत प्रश्न विचारला होता. स्मारकाची उभारणी किती कालावधीत करणार आणि त्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करणार का, अशी विचारणा या सदस्यांनी केली.
इंदू मिलच्या संपूर्ण जमिनीवर आंबेडकर स्मारकासाठी आरक्षण बदलण्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचे हे आंतराष्ट्रीय स्मारक आहे. त्याबाबतचे नियोजन करणे, वास्तूविशारदाची नियुक्ती करणे, इत्यादी प्राथमिक कामांची जबाबदारी एमएमआरडीकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय माझ्या अध्यक्षतेखाली एक सुकाणू समिती आहे. त्यामुळे वेगळे प्राधिकरण स्थापन करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader