रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना-भाजपबरोबर युती करण्याच्या भूमिकेवर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उघडपणे नाराजी व्यक्त करू लागले आहेत.
रिपब्लिकन गटांना फक्त वापरून घेणाऱ्या प्रस्थापित पक्षांशी हातमिळवणी करण्याऐवजी भारिप-बहुजन महासंघ, रिपब्लिकन पक्षाचे विविध गट आणि बहुजन समाज पक्षाने राज्यात स्वतंत्र आघाडी उभी करून निवडणुका लढवाव्यात, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या वीस-पंचवीस वर्षांत रिपब्लिकन पक्षाचे स्वतंत्र अस्तित्वच राहिलेले नाही. रा.  सु. गवई यांच्यानंतर रामदास आठवले यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर तब्बल वीस वर्षे युती केली. नेता मोठा झाला, परंतु पक्ष आणि कार्यकर्ते आहेत, तेथेच राहिले. आता त्यांनी शिवसेना-भाजपशी समझोता केला आहे.
परंतु या पक्षांकडून आरपीआयची म्हणावी तशी दखल घेतली जात नाही. आमच्या पक्षाला सन्मानाने वागवा, असे नेत्याला सांगावे लागते, अशी स्वाभिमान्यशून्य युती कशासाठी करायची, असा सवाल आरपीआयमधीलच कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत.
काँग्रेसशी नीट राजकीय सौदा जमला नाही म्हणून गवई गटाने राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली आहे. अर्धा रिपब्लिकन आणि अर्धा पँथर असा वेगळाच गट चालविणारे गंगाधर गाडे यांनीही सध्या राष्ट्रवादीचा आश्रय घेतला आहे.
सकारात्मक प्रतिसाद नाही
पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडेही कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करीत असतात. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बुजन महासंघानेही काँग्रेसबरोबर युती करण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु काँग्रेसकडून फार सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने भारिपमध्ये नाराजी आहे.

गटा-तटांच्या विभागणीचा फटका
काँग्रेसबरोबर सन्मान्य युती झाली नाही, तर स्वबळावर निवडणुका लढण्याची किंवा तिसरी आघाडी उभी करण्याची भारिपने तयारी केली आहे. परंतु रिपब्लिकन पक्षाची आधीच गटा-तटांमध्ये विभागणी झाली आहे. आता कुणी सेना-भाजप तर, कुणी काँग्रेस-राष्ट्रवादी अशी स्वतची वाटणी करून घेत आहेत, त्याऐवजी बसपसह सर्व रिपब्लिकन गटांनी स्वतंत्र निवडणूक आघाडी करावी, अशी कार्यकर्त्यांकडून मागणी होत आहे. 

Story img Loader