मुंबई : मध्य रेल्वेवरील कल्याण – बदलापूरदरम्यानच्या पुलाच्या पायाभूत कामासाठी शनिवारी रात्रकालीन विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अंबरनाथ – कर्जत लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. तसेच ब्लाॅक कालावधीत लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना काही काळ थांबावे लागणार आहे. काही लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कल्याण आणि बदलापूरदरम्यान नवीन पाइप लाइन पुलाच्या बांधकामासाठी शनिवारी रात्रकालीन अप आणि डाऊन मार्गावर, तसेच उड्डाणपुलाचे गर्डर उभारण्यासाठी ब्लाॅक घेण्यात येणार आहे. यावेळी दोन क्रेनचा वापर करून पायाभूत कामे करण्यात येणार आहेत. शनिवारी रात्री १.३० वाजता ते रविवारी पहाटे ४.३० पर्यंत ब्लाॅक सुरू असेल. ब्लाॅक कालावधीत लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. तसेच, काही लांबपल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांना ठाण्याला थांबा देण्यात येणार आहे.
अंबरनाथ – कर्जत स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नाही
- परळ येथून रात्री ११.१३ वाजता परळ – अंबरनाथ लोकल बदलापूरपर्यंत चालवण्यात येईल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ११.५१ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बदलापूर लोकल अंबरनाथ येथे अंशतः रद्द करण्यात येईल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२.१२ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कर्जत लोकल अंबरनाथ येथे अंशतः रद्द करण्यात येईल.
- कर्जत येथून रात्री २.३० वाजता सुटणारी कर्जत – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल अंबरनाथ येथून अंशतः रद्द करण्यात येईल. आणि अंबरनाथ येथून रात्री ३.१० वाजता सुटेल.
- कर्जत- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष लोकल कर्जत येथून पहाटे ४.१० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ६.०८ वाजता पोहोचेल.
वांगणी , नेरळ रेल्वे स्थानकादरम्यान लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबणार
गाडी क्रमांक २२१७८ सिकंदराबाद -राजकोट एक्स्प्रेस पहाटे ४.१० ते ०४.३० पर्यंत वांगणी स्थानकादरम्यान थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक ११०२२ तिरुनेलवेली -दादर एक्सप्रेस पहाटे ४.१७ ते पहाटे ४.२७ पर्यंत नेरळ स्थानकादरम्यान थांबवण्यात येईल. तर, विलंबाने चालणाऱ्या मेल / एक्स्प्रेस / हॉलिडे विशेष रेल्वे गाड्या विभागीय गरजेनुसार वळवल्या जातील.
रेल्वेगाड्या कर्जत – पनवेल – दिवामार्गे वळवण्यात येणार
गाडी क्रमांक ११०२० भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १८५१९ विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२७०२ हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसैनसागर एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १११४० होसपेट – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक २२१५८ चेन्नई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस कर्जत – पनवेल – दिवामार्गे वळवण्यात येतील. तसेच कल्याण नियोजित थांबा असलेल्या लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना ठाणे येथे थांबा देण्यात येणार आहे.