मुंबई : अंधेरी (पश्चिम) येथील दादाभाई नौरोजी नगर (डी. एन. नगर) आणि जुहू – गुलमोहर मार्ग परिसरातील इमारतीच्या उंचीवरील निर्बंध उठण्यासाठी आता पुढील पावसाळी अधिवेशनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या परिसरातील सुमारे चारशे जुन्या इमारतींचा पुनर्विकास सुरु होण्यास विलंब लागणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचा (एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया) ‘हाय-फ्रिक्वेन्सी ट्रान्समिशन टॉवर’ अन्यत्र स्थलांतरित करण्यासाठी जमीन वाटपाची प्रक्रिया पुढील पावसाळी अधिवेशनापूर्वी पूर्ण केली जाईल, असे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिले आहे. स्थानिक भाजप आमदार अमीत साटम यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रस्तावावर ते बोलत होते.

हाय-फ्रिक्वेन्सी ट्रान्समिशन टॉवर्समुळे संबधित परिघातील इमारतींच्या उंचीवर निर्बंध आले होते. त्यामुळे डी. एन. नगरसह जुहूतील जुन्या निवासी इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. गेल्या चार वर्षांहून अधिक काळ याबाबत राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. तरीही अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही, असे आमदार साटम यांनी सांगितले.या इमारती ४०-५० वर्षांहून अधिक जुन्या आहेत. मध्यमवर्गीयांनी कष्टाच्या पैशाने ही घरे खरेदी केली आहेत. या इमारती बेकायदेशीर नाहीत किंवा अतिक्रमण नाहीत. सरकारने कालबद्ध पद्धतीने यावर तोडगा काढण्याची गरज आहे. सरकार किती दिवसांत हाय-फ्रिक्वेन्सी ट्रान्समिशन टॉवर्स दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करेल, असा सवाल आमदार साटम यांनी केला.

याबाबत उद्योग मंत्री म्हणाले की, टॉवर्स स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यासाठी समितीने त्या जागेला भेट देण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर टॉवर्स स्थलांतरित करण्याची प्रक्रिया ताबडतोब सुरू करता येईल. याबाबत नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी ते सकारात्मक आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील लोकप्रतिनिधी आणि स्थानिक लोकांच्या तीव्र भावना केंद्र सरकारला कळवल्या आहेत. पुढील विधानसभा अधिवेशनापूर्वी, टॉवर्स स्थलांतरित करण्यासाठी जमीन वाटपाची प्रक्रिया पूर्ण करू. त्यानंतर उंचीवरील निर्बंध शिथिल करण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल, असे सामंत यांनी सांगितले.