शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अमेय घोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर पत्रकारांनी पक्षांतराचं कारण विचारलं असता अमेय घोले यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव घेत पक्षातील वरिष्ठांबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आणि पक्षांतराचं कारण सांगितलं. ते सोमवारी (१७ एप्रिल) रात्री मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
अमेय घोले म्हणाले, “मी पक्ष सोडण्याची कारणं माझ्या राजीनाम्यात स्पष्टपणे लिहिली आहेत. त्याशिवायचे जे विषय होते ते मी आदित्य ठाकरेंना आधीच सांगितले होते. त्यावर आमचं बोलणं झालं होतं. आम्हाला सेनेभवनात मोकळेपणाने कुठेच काम करता येत नव्हतं. विधानसभा मतदारसंघात आम्ही गुणवत्तेवर आमची कामं करत होतो. शाखेच्या माध्यमातून काम करून दाखवत होतो. मात्र, हे काम करताना विभागातील वरिष्ठ सारखे सारखे आम्हाला त्रास देण्याचं काम करत होते. आमच्या विरोधात कटकारस्थान करून त्रास देण्याचं काम सुरू होतं.”
“दोन वर्षे या गोष्टी सुरू होत्या”
“शिवसेना भवनातून निरोप यायचे नाहीत. आम्ही काही काम सांगितलं, तर त्याच्या उलटंच व्हायचं. दोन वर्षे या गोष्टी सुरू होत्या. त्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं होतं. मागील सात-आठ महिन्यापासून आम्ही या गोष्टी एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहचवत होतो. त्यावर ठोस निर्णय आला नाही. त्यामुळे हा पक्षांतराचा निर्णय घेण्यात आला,” असं मत अमेय घोले यांनी व्यक्त केलं.
“एकच माणूस निर्णय घ्यायचा आणि आमच्यावर थोपवायचा”
सुरज चव्हाण, श्रद्धा जाधव यांच्यावर बोलताना अमेय घोले म्हणाले, “सुरज चव्हाण, श्रद्धा जाधव यांच्यामुळे आम्हाला कुठेच काम करता येत नव्हतं. आम्ही कोअर कमिटी म्हणून होतो, तरी निर्णय प्रक्रियेत आम्हाला घेतलं जात नव्हतं. सिद्धेश, पुर्वेश आणि श्रीकांत यांनाही विचारलं तर तेही सांगतील की मोकळीक नव्हती. एकच माणूस निर्णय घ्यायचा आणि तो निर्णय आमच्यावर थोपवायचा.”
“या गोष्टी वारंवार आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवल्या”
“अशाप्रकारे निर्णय थोपवणं चालणार नव्हतं. या गोष्टी आम्ही वारंवार आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवल्या होत्या. त्यांच्याकडून करू करू म्हणत सकारात्मक उत्तर येत होतं. मात्र, त्यांच्याकडून फार उशीर झाला. त्यामुळे आज हा निर्णय घेतला,” असंही अमेय घोले यांनी नमूद केलं.