मुंबई महानगर पालिकेत आदित्य सेनेने जणू काही भ्रष्टाचाराचा वर्ल्ड रेकॅार्ड करायचे ठरवले आहे, असा आरोप भाजपाचे आमदार अमित साटम यांनी केला आहे. त्यांनी सुधार समितीच्या बैठकीत प्रकल्पबाधितांसाठी आणलेल्या एका प्रस्तावावरून टीका केली आहे.
त्या प्रस्तावात तीनशे चौरस फुटाची सदनिका ही तब्बल एक कोटी सत्तावन लाख रूपये किमतीची आहे. म्हणजेच ५२ हजार प्रति चौरसफुट या दराने ५२९ सदनिका घ्यायचे पालिकेने ठरवले आहे. साधारणपणे सरासरी आजपर्यंत प्रत्येकी १७ लाख रूपये या किमतीत सदनिका विकत घेतल्या जातात. पण सगळे पायंडे पायदळी तुडवत बिल्डरला ६०० कोटीचा फायदा टक्केवारीसाठी करून दिला जातोय. पण आम्ही मुंबईकरांच्या कराचा पैसा बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही, असं साटम म्हणाले.
त्यासाठी गरज पडल्यास आम्ही न्यायालयीन लढाई लढू, अशी भूमिकाही त्यांनी घेतली. तसेच “बिल्डरांसोबत भागीदारी करून महापालिकेच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडा घालायचं काम होतंय. जेव्हा यांच्यावर आयकर विभाग कारवाई करतं तेव्हा हे मराठीद्रोही, महाराष्ट्रद्रोही म्हणून उलट्या बोंबा मारतात. तुमचा हा ढोंगीपणा आता सर्व मुंबईकरांना कळाला आहे,” असेही साटम महणाले.