भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली असून यावेळी सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. मुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शाह यांनी मातोश्रीवरुन जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा सुरु होती. यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र चर्चा सकारात्मक होती एवढं मात्र कळलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भेटीआधी भाजपावर टीका करणारी शिवसेना पुन्हा एकदा मवाळ होताना दिसत आहे. कारण अमित शाह आणि उद्धव ठाकरे येत्या महिन्यात दोन ते तीन बैठका घेणार आहेत. समन्वय वाढवण्यासाठी दोन्ही पक्षांनी हा निर्णय घेतला असल्याचं समजत आहे. यानिमित्ताने दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेला तणावही निवळेल अशी दोन्ही पक्षांना अपेक्षा आहे.

मागील चार वर्षांपासून शिवसेना-भाजपामध्ये असलेली नाराजी आणि मतभेदांची दरी दूर करणे हा या बैठकीमागे महत्वाचा उद्देश होका. स्वत: भाजपा अध्यक्षांनी युतीची तयारी दाखवली आहे. मित्रपक्षांमध्ये मतभेद होत असतात असे शहा म्हणाले. त्यामुळे मैत्रीचा चेंडू आता शिवसेनेच्या कोर्टात आहे.

भाजपाकडून मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीला कंटाळून एकला चलो रे चा नारा देणाऱ्या शिवसेनेने या बैठकीआधी आपण झुकणार नाही अशी आक्रमक भाषा केली होती. पण प्रत्यक्षात शहांच्या स्वागतासाठी मातोश्रीने कुठलीही कसूर ठेवली आली. खास त्यांच्या आवडीचा गुजराती मेन्यू होता. एकूणच दोन्ही बाजूंनी सकारात्मक संदेश दिला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल आणि विविध सर्वेक्षण चाचण्यांचा कौल पाहिला तर २०१९ मध्ये भाजपाला केंद्रात स्वबळावर सत्तेत येणे शक्य नाहीय. त्यांना मित्रपक्षांच्या टेकूची गरज लागणार आहे. पालघरची लोकसभेची जागा भाजपाने जिंकली असली तरी शिवसेनेच्या आणि भाजपाच्या मतांमध्ये फार अंतर नाहीय. लोकसभेलाही दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले तर भाजपाला निश्चित फटका बसू शकतो. त्यामुळे भाजपाने आता मैत्रीची पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah and uddhav thackeray meeting was positive
Show comments