मुंबई : रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या शनिवारी रायगड दौऱ्यावर आहेत. शहा या वेळी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्या रोह्यातील निवासस्थानी भेट देणार आहे. तसेच स्नेहभोजनही करणार आहेत. परंतु या भेटीमुळे शिवसेना शिंदे गट व भरत गोगावले अस्वस्थ झाल्याची चर्चा आहे.

शहा हे शनिवारी रायगड किल्ल्यावर येणार आहेत. येथील कार्यक्रम संपल्यावर ते खासदार तटकरे यांच्या रोहा तालुक्यातील सुतारवाडी निवासस्थानी भेट देणार आहेत. दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी घरी येण्याचे दिलेले निमंत्रण अमित शहा यांनी स्वीकारल्याने शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

आदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण शिंदे यांनी नवी दिल्लीत तक्रार केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या २४ तासांत त्याला स्थगिती दिली होती.

अमित शहा तटकरे यांच्या निवासस्थानी जाणार असल्याने गोगावले अधिक अस्वस्थ असल्याचे बोलले जाते. तटकरे आपले वजन वापरून रायगडचे पालकमंत्रीपद मुलीकडे कायम ठेवतील, अशी भीती त्यांना आहे. शहा यांच्या सुतारवाडीतील भेटीच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल उपस्थित राहणार आहेत. शिंदे व गोगावले तेथे उपस्थित राहणार का, याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

शहा दोन दिवस महाराष्ट्रात

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवस महाराष्ट्रात दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी रात्री आठ वाजता पुण्यात त्यांचे आगमन होईल व तेथे मुक्काम असणार आहे. शहा हे शनिवारी सकाळी रायगडला जाणार असून, आधी पायथ्याशी पाचड येथे राजमाता जिजाबाईंच्या समाधीचे दर्शन घेतील. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. सायंकाळी विलेपार्ले येथे एका प्रसिद्धीमाध्यमाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर शनिवारी रात्री ते सह्याद्री अतिथीगृहावर फडणवीस, शिंदे, पवार व अन्य नेत्यांशी चर्चा करतील, असे भाजप सूत्रांनी सांगितले.