मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रविवारी रात्री मुंबई दौऱ्यावर येत असून प्रदेश सुकाणू समितीतील पदाधिकारी आणि मुंबई प्रदेश पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. शहा हे दरवर्षी गणेशोत्सवात मुंबईत येतात. मुंबई ही त्यांची जन्मभूमी असून मुंबईबद्दल शहा यांना विशेष प्रेम आहे. ते या मुंबई भेटीत लालबागचा राजा, मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांच्या गणपतीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माझ्या घरीही गणेश दर्शनासाठी येणार आहेत. ते मुंबईत असल्याने प्रदेश सुकाणू समिती व मुंबई प्रदेश पदाधिकारी यांच्याशी चर्चा करावी, अशी आमची विनंती त्यांनी मान्य केली असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. एल अॅण्ड टी कंपनीने उभारलेल्या शाळेचे उद्घाटन शहा यांच्या हस्ते सोमवारी होणार आहे. केंद्र सरकार अंमलबजावणी संचालनालय व अन्य केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधी पक्षांच्या नेत्यांवर करीत असल्याच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तण्त्त्व उत्तुंग असून त्यांनी आपल्या कार्यातून विकासाची रेषा आखली आहे. त्यांना आपल्या कार्यकर्तृत्वाने उत्तर देता येणे विरोधकांना शक्य नाही. पण पंतप्रधान मोदी यांनी आखलेली विकास रेषा मिटविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वाने त्याहून मोठी रेषा विरोधकांनी आखावी, असा माझा त्यांना सल्ला आहे.
‘उरलेल्या पक्षाला पेंग्विन सेना म्हणायचे का?’
उरलेल्या पक्षाला पेंग्विन सेना म्हणायचे का, असा टोला मुंबई भाजप अध्यक्ष अँड. आशीष शेलार यांनी लगावला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ मुखपत्रातून भाजपला ‘कमळाबाई’ असे हिणवले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना शेलार म्हणाले, बाईमध्ये आई, ताई आणि कडकलक्ष्मी पण आहे. आमच्याकडेही तुम्हाला उत्तर द्यायला कडक मुंबईकर शब्द आहेत.