भाजपचे अध्यक्ष अमित शहा व सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीनंतर विधानसभा निवडणुकीच्या राजकीय व्यूहरचनेला आकार देण्यात आला आहे. महायुतीतील जागावाटपासंदर्भात भाजपची भूमिका ठरविण्यात आली असून खोळंबलेली निर्णयप्रक्रिया आता मार्गी लागणार आहे. त्यामुळे पुढील आठवडय़ापासून अन्य राजकीय पक्षांमधून भाजपमध्ये येणाऱ्यांचे पक्षप्रवेशही केले जाणार आहेत.
विधानसभा निवडणूक तयारीच्या दृष्टीने शहा आणि सरसंघचालक भागवत यांच्या भेटीला खूप महत्व आहे. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला असताना शिवसेनेशी युती तोडावी किंवा नाही, याबाबत दोघांमध्ये सखोल चर्चा झाल्याचे समजते. भाजपच्या प्रदेशातील नेत्यांना फारशी किंमत न देता जागावाटपाची बोलणी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशीच करण्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. भाजपला अधिक जागा हव्या असून जागावाटपाची बोलणी सुरू होण्याआधीच खणाखणी झाल्याने चर्चेसाठी कोणी पुढाकार घ्यायचा, अशी कोंडी निर्माण झाली आहे. राज्यात मोठा भाऊ शिवसेना असल्याने जागावाटपाची बोलणी सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी भाजपची भूमिका आहे. तर शिवसेना काहीच पावले टाकत नसल्याने चर्चाच सुरू होऊ शकलेली नाही.  सेनेसोबत जागावाटपाची बोलणी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने थेट बोलणी करू नयेत, अशी भूमिका घेण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत अन्य पक्षांमधील अनेक नेत्यांनी भाजपचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यांच्याबाबतचे निर्णय प्रलंबितच आहेत. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर तर निर्णय न झाल्याने शिवसेनेकडे गेले. कोणत्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा आणि काय आश्वासने द्यायची, याची भूमिका ठरविण्यात आली आहे. अन्य पक्षांमधील प्रस्थापितांना किंवा ज्येष्ठ नेत्यांना तसेच आरोप व वादग्रस्त असलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्यांची पुढील पिढी किंवा समाजकारणात चांगली प्रतिमा असलेल्यांच्या नेतृत्वाला वाव दिला जाणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये अशा नेत्यांचे प्रवेश भाजपमध्ये होतील, असे सूत्रांनी सांगितले.
आजपासून प्रशिक्षण वर्ग
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्यातील भाजपचे सर्व प्रमुख नेते व निवडक पदाधिकाऱ्यांचा दोन दिवसांचा प्रशिक्षण वर्ग आयोजित केला आहे. उद्या, शनिवारी दुपारी १२ वाजतापासून सुरू होणारा हा वर्ग २० जुलैला सायंकाळी ४ वाजता संपणार आहे. या वर्गासाठी  प्रत्येक जिल्ह्य़ातील निवडक पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे.

Story img Loader