मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी सायंकाळी मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांनी मुख्य मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राजकीय रणनीतीवर विस्तृत चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांच्याकडून शहा यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहा यांच्या हस्ते ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना  महाराष्ट्र भूषण पुरस्कार रविवारी नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भव्य समारंभात देण्यात येणार आहे. यानिमित्ताने शहा यांचे शनिवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास मुंबई विमानतळावर आगमन झाले. शिंदे, फडणवीस, बावनकुळे आदी नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.  राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या मातोश्री विजया तावडे यांचे नुकतेच निधन झाले आहे. शहा यांनी तावडे यांच्या विलेपार्ले येथील निवासस्थानी जाऊन विचारपूस केली.

शहा यांनी आठच्या सुमारास सह्याद्री  अतिथीगृहात पक्षाच्या नेत्यांच्या बैठका घेतल्या. मुंबईतील निवडणूक तयारीच्या दृष्टीने शहरातील खासदार, आमदार व सुकाणू समितीच्या नेत्यांशी शहा यांनी चर्चा केली. शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, मनोज कोटक, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आदी नेते या बैठकीस उपस्थित होते. पक्षाच्या निवडणूक केंद्र (बूथ) पातळीवरील तयारीविषयी शहा यांना  माहिती देण्यात आली.  मुंबईत उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी अन्य पक्षातील कोणत्या नेत्यांना भाजपमध्ये आणता येईल, मुंबई विमानतळ झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनाबाबत प्रलंबित असलेल्या प्रश्नांसह कोणते विषय केंद्र सरकार कडून मार्गी लावणे आवश्यक आहे, याबाबत बैठकीत चर्चा झाली. भाजप व शिंदे गटाचे राज्यात लोकसभेच्या ४५ तर विधानसभेच्या २०० जागा जिंकण्याचे नियोजन आहे. त्या दृष्टीने चर्चा झाली.

वादग्रस्त वक्तव्य टाळण्याच्या सूचना

प्रदेश पातळीवरील निवडणूक तयारीसंदर्भातही निवडणूक तयारीचा आढावा घेताना शहा यांनी नेत्यांना वादग्रस्त वक्तव्ये टाळण्याच्या सूचना दिल्या. भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये वाद होऊ नये, यासाठी काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.  शहा यांनी रात्री उशिरा शिंदे आणि फडणवीस यांच्याशी राज्यातील राजकीय घडामोडींविषयी सविस्तर चर्चा केली. अन्य पक्षातील काही बडय़ा नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याविषयी चर्चा सुरू असून त्यादृष्टीने शहा यांनी शिंदे व फडणवीस यांच्याशी चर्चा केली. पुढील एक-दोन महिन्यात टप्प्याटप्प्याने या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन विरोधी पक्ष खिळखिळे करण्याची भाजपची योजना आहे. राज्यातील सत्ता संघर्षांबाबत पुढील काही दिवसात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अपेक्षित आहे. त्या अनुशंगानेही बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. भाजप प्रदेश सुकाणू समितीतील नेते आणि मंत्री मात्र या बैठकांना उपस्थित नव्हते. या बैठकांचे सत्र मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah preparations win mumbai discussion shinde fadnavis resolving pending issues in the city ysh
Show comments