महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी आज(शुक्रवार) दादर ते अंबरनाथ असा लोकल ट्रेनने प्रवास केला. सध्या त्यांनी राज्यभरातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी महासंपर्क अभियान सुरू केले आहे. या निमित्त ते राज्यभरात विविध ठिकाणी दौरे करत आहेत.

सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अमित ठाकरे यांचे अंबरनाथमध्ये आगमन झाले. अमित ठाकरे अंबरनाथ मधील प्राचीन शिवमंदिरात दर्शन घेत आपल्या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. अंबरनाथच्या रोटरी सभागृहात ते कार्यकर्त्यांची संवाद साधतील. त्यानंतर बदलापूर आणि उल्हासनगर या शहरांमध्ये ही अमित ठाकरे कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहेत.

पक्षाला उभारी देण्यासाठी अमित ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा –

अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगर या तीनही शहरांमध्ये मनसेची परिस्थिती तोळामासा आहे. उल्हासनगर आणि बदलापूर शहरात मनसेचा एकही नगरसेवक गेल्या पालिकेत नव्हता. अंबरनाथमध्ये हाताच्या बोटावर मोजण्यात की नगरसेवक मनसेचे होते. त्यामुळे पक्षाला उभारी देण्यासाठी अमित ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी १५ दिवसांत मुंबईतील ३६ विधानसभा मध्ये हजारो विद्यार्थ्याशी संवाद साधला आणि त्यानंतर नवीन नेमणुका जाहीर केल्या. यानंतर अमित ठाकरे सात दिवसांसाठी कोकण दौऱ्यावरही गेले होते. या सात दिवसात अमित ठाकरेंनी तालुका तसंच गाव पातळीवरील स्थानिक मनसे पदाधिकारी तसंच मनविसे पदाधिकारी आणि महाविद्यालयीन तरुण तरुणी यांच्याशी संवाद साधला.

मनविसे ही महाराष्ट्रातील सर्वात प्रबळ आणि प्रभावी विद्यार्थी संघटना बनवण्याचा निर्धार अमित ठाकरे यांनी मुंबईतील प्रत्येक बैठकीत व्यक्त केला होता. मुंबईत अमित ठाकरे यांच्या मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते.

Story img Loader