राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवारांनी अनेक ज्येष्ठ नेत्यांना बरोबर घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे यात शरद पवारांचे विश्वासू मानले जाणारे अनेक आमदार-खासदारही होते. खासदार अमोल कोल्हेही बंडखोरीनंतर झालेल्या शपथविधी कार्यक्रमाला हजर होते. मात्र, त्यानंतर त्यांनी आपण शरद पवारांबरोबर असल्याचं स्पष्ट करत खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं. आता शरद पवारांच्या भेटीनंतर त्यांनी घोषणा केलेल्या राजीनाम्याचं काय झालं असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत मंगळवारी (४ जुलै) त्यांना विचारलं असता त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
अमोल कोल्हे म्हणाले, “मी माझी राजीनाम्याबाबतची अस्वस्थता लिखित स्वरुपात शरद पवारांना कळवली. त्यावर शरद पवारांनी मला मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांनी मला आठवण करून दिली की, शिरुर मतदारसंघातील मायबाप मतदारांनी ५ वर्षांसाठी निवडून दिलं आहे. अनेक कामं मार्गी लागलेले आहेत आणि अनेक कामं मार्गी लागत आहेत. असं असताना या मतदारांनी दाखवलेल्या विश्वासावर आपण ठाम राहिलं पाहिजे.”
“…म्हणून महाराष्ट्रभरात फिरायला हवं”
“महाराष्ट्रातील तरुणाईचा लोकशाही प्रणालीवर आणि लोकशाहीतील मुल्यांवर, राजकारणातील नैतिकतेवर विश्वास रहावा म्हणून महाराष्ट्रभरात फिरायला हवं,” असंही शरद पवारांनी म्हटल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.
शरद पवार अमोल कोल्हेंना नेमकं काय म्हणाले?
“अमोल, ही अस्वस्थता फक्त तुझ्याच नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक युवक व मतदाराच्या मनात आहे. आता आपल्याला लोकशाही मूल्ये टिकवण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल. शिरूरच्या मायबाप जनतेने ५ वर्षांसाठी दिलेल्या जबाबदारीचे ८-१० महिने अजून बाकी आहेत. या कार्यकाळात अनेक कामे मार्गी लागली असून अनेक महत्वकांक्षी प्रकल्प दृष्टीक्षेपात आहेत. हे प्रलंबित प्रकल्प मार्गी लावणेही तुझं कर्तव्य आहे.”
“मी माझी अस्वस्थता शरद पवारांसमोर मांडली”
शरद पवारांच्या भेटीत काय झालं हे सांगताना अमोल कोल्हे म्हणाले, “मी माझी भावना, अस्वस्थता शरद पवारांसमोर मांडली. आज महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, घडामोडी बघितल्या, तर राजकारणातील नैतिकता, विश्वासार्हता, उत्तरदायित्व या सगळ्याच गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.”
“मी शरद पवारांना एक पत्र दिलं”
“मी शरद पवारांना एक पत्र दिलं आहे. त्यात हीच भूमिका मांडली की, मी आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका करत आलो आहे. त्यामुळे ३५० वर्षे अस्तित्वात असलेलं स्वराज्य निर्माण केल्यानंतरही त्याला रयतेचं राज्य म्हणणाऱ्या महाराजांचा आदर्श ठेऊन मी राजकारणात आलो,” असं अमोल कोल्हेंनी म्हटलं.
हेही वाचा : शरद पवारांबाबत ‘तो’ प्रश्न विचारताच जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर, म्हणाले, “त्यांचं वय ८४ वर्षे…”
“पवारांनी मला हीच अस्वस्थता महाराष्ट्रातील तरुणांमध्ये असल्याचं सांगितलं”
“आताच्या परिस्थितीत विश्वास ठेवणाऱ्या मतदारांना फसवल्यासारखं वाटतंय ही अस्वस्थता मी मांडली. तसेच शरद पवार यांच्याकडे मार्गदर्शन मागितलं. हे मी लिखित स्वरुपात त्यांना दिलं. यावर शरद पवारांनी मला हीच अस्वस्थता महाराष्ट्रातील तरुणाईची आहे, असं सांगितलं. तसेच त्यांचा लोकशाही प्रणालीवर विश्वास बसावा म्हणून काम करणं गरजेचं असल्याची आठवण करून दिली,” असंही अमोल कोल्हेंनी नमूद केलं.