कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी ( २ मार्च ) लागला. या निवडणुकीत कसब्याच्या जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला. तर, चिंचवडच्या जागेवर भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप जिंकल्या आहेत. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव झाला आहे. यावरून भाजपा नेते निलेश राणेंनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवर खालच्या भाषेत टीका केली आहे.
काय म्हणाले निलेश राणे?
ट्वीट करत निलेश राणे म्हणाले की, “पिंपरी-चिंचवडमध्ये एका महिलने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडलं. **** अजित पवार एक महिना पिंपरी-चिंचवडला ठाण मांडून सुद्धा तुला एका महिलेने पाडलं,” अशा एकेरी शब्दांत निलेश राणेंनी अजित पवारांवर टीकास्र डागलं होतं.
यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर देत निलेश राणेंचा समाचार घेतला आहे. “आमच्या पक्षाचा एक संस्कार आहे, जो शरद पवारांनी दिला आहे. एखादं वराह जर घाणीत लोळत असेल, तर त्यावर दगड मारू नये, कारण घाण आपल्या कपड्यावर उडते. पिंपरी-चिंचवडची जागा निवडून आली, तर उन्माद आणि मस्ती कशासाठी करायची. स्वत:चे सिंहासन २०२४ साली वाचवता येत असेल तर पाहा,” असं अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.
हेही वाचा : संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार? ‘त्या’ प्रकरणावरून शिंदे गटातील आमदाराने दिला इशारा
“अजित पवारांवर बोलण्याची तुमची वैचारिक आणि शारीरिक उंची नाही. त्यामुळे आपल्या लायकीत बोलावं. आम्हाला पक्षाने काही मर्यादा दिल्या आहेत. नाहीतर जशास तसे उत्तर आम्हालाही देता येतं. मी शेतकऱ्याचा मुलगा असून, फुले-शाहू-आंबेडकर महाराष्ट्राला सांगणारी व्यक्ती आहे. त्यामुळे शरद पवार, अजित पवार आणि पक्षावर बोलणार असाल तर शेपूट गुंडाळून बसणार नाही. ‘तुका म्हणे खळ करु समय निर्मळ,'” असा इशारा अमोल मिटकरींनी दिला आहे.
हेही वाचा : “निवडणूक आयोग राजकीय मालकांसाठी काँट्रॅक्ट किलर पद्धतीने…”, ठाकरे गटाचा हल्लाबोल!
आमदार नितेश राणेंनी खासदार संजय राऊत यांच्याबद्दल विधानसभेत केलेल्या एका विधानावरही अमोल मिटकरींनी भाष्य केलं आहे. “पोलीस हटवा १० मिनीटांत उत्तर देतो, असं ओवैसींनी म्हटलं होतं. तेव्हा, किती लोकं त्याच्याविरोधात गेली होती. हे टिल्ले, पिल्ले, चिल्ले आहेत, त्यातील एकाने १० मिनीट पोलीस संरक्षण हटवा, आम्ही संजय राऊतांना दुसऱ्या दिवशी दिसू देणार नाही, असं सांगितलं. सभागृहात दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम होत आहे,” असं अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.