ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. मात्र, भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर भाजपाचे नेते संदीप जाधव यांनी आक्षेप घेतला असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत पत्र लिहिले. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपा-शिंदे गटावर खोचक शब्दात टीका केली आहे. तसेच जुन्या पेन्शन योजनेवरूनही त्यांनी राज्य सरकारवर टीकास्र सोडलं. विधिमंडळ परिसरात टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
जुन्या पेन्शनवरून अमोल मिटकरींचं टीकास्र
”काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचाऱ्याच्या जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक असल्याचे वृत्त होतं. मात्र, त्यावर तोडगा निघू शकला नाही. याचा अर्थ जुनी पेन्शन लागू करण्याच्या मनस्थितीत हे सरकार नाही. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असलेला रोष वाढत जाणार आहे”, अशी प्रतिक्रिया अमेल मिटकरी यांनी दिली.
हेही वाचा – “शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे शांत का?”, संजय राऊतांचा सवाल; म्हणाले, “बदनामी ही फक्त…”
भाजपा शिंदे गटावर खोचक टीका
यावेळी भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला भाजपा नेत्याने घेतलेल्या आक्षेपाबाबत बोलताना त्यांनी भाजपा-शिंदे गटावर खोचक शब्दात टीका केली. ”जर भारतीय जनता पक्ष म्हणत असेल की देसाईंचा मुलगा भ्रष्टाचारी आहे. तर यापेक्षा जास्त मोठा पुरावा काय हवा? कारण भाजपाचे नेते राजा हरीशचंद्र आहेत. त्यांनी शिक्कामोर्तब केलं असेल तर ते नक्कीच खरं असेल. त्यामुळे भूषण देसाईंना पक्षात ठेवायचं की नाही, हा निर्णय मुख्यमंत्री घेतील”, असे ते म्हणाले.